गडचिरोली, दि.५ (पीसीबी) – गडचिरोलीतून मन हेलावून टाकणार व्हिडीओ समोर आला आहे. मुलांना ताप आल्यामुळे त्यांना उपचारासाठी आई- वडिलांनी एका पुजाऱ्याकडे नेले. मात्र या दोन्ही चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाला. या घटनेनंतर आई- वडिलांनी रुग्णालय गाठले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह चक्क खांद्यावर घेऊन १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. हा सगळा प्रकार बुधवारी गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे घडला आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बाजीराव रमेश वेलादी (वय ६ ) व दिनेश रमेश वेलादी (३ वर्ष ६ महीने दोघे रा. येर्रागड्डा ता. अहेरी) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नवे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्तीगाव या त्यांच्या आजोळी हे दोन्ही भावंड गेले होते. बुधवारी बाजीरावला ताप आला त्यानंतर दिनेशलाही ताप भरला. मुले आजारी पडल्याने आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे घेऊन गेले. त्यावेळी त्या पुजाऱ्याने दोघांना काही जडीबुटी दिली. त्यानंतर जडीबुटी खाल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली. दरम्यान सकाळी साडेदहा वाजता बाजीरावने जीव सोडला. तर दुपारी बारा वाजता दिनेशनेही प्राण सोडले. जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावात रुग्णवाहिका येऊ शकली नाही, त्यामुळे या चिमुकल्यांना कडेवर घेऊन आई- वडिलांना अवघड घाट रस्त्यातून वाट तुडवत दवाखाना गाठवा लागला. पोटच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने पत्नीने हंबरडा फोडला. दोघांनी जिमलगठ्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रात जात मुलांना दाखवले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात देखील रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका आणू अशी तयारी आरोग्य अधिकाऱ्यांनी दाखवली. मात्र, गरीब पालकांनी ही मदत नाकारत शेवटी जन्मदात्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किलोमीटरची पायपीट केली.
या मन हेलावणाऱ्या आई-वडिलांचा दोन्ही मुलं खांद्यावरून घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे वेदनादायी वास्तव समोर आले. या घटनेननंतर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर अजूनही काही भागात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जातो, हे चित्र खूपच अस्वस्थ करणारं आहे.
या घटनेनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले.
गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे.