दोन कंटेनरची दोघांना धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

0
110

तळेगाव, दि. 12 (प्रतिनिधी)

दोन कंटेनरने एकमेकांना ओव्हरटेक करताना दोन मुलांना धडक दिली. त्यात एका मुलाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास नवलाख उंब्रे येथे घडली.

सार्थक विठ्ठल वायकर (वय 16) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर समर्थ आबाजी वायकर (वय 16, दोघे रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे जखमी मुलाचे नाव आहे. पंडित रामचंद्र जाधव (वय 52, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच 14/केए 3427) चालक राजू सिताराम मुंडे (वय 28, रा. येलवाडी, ता. खेड) आणि कंटेनर (एमएच 14/ईएम 5097) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कंटेनर चालकांनी त्यांच्या ताब्यातील कंटेनर एकमेकांना ओव्हरटेक करत असताना नवलाख उंब्रे येथील जाधववाडी जवळ सार्थक आणि समर्थ या दोघांना धडक दिली. त्यामध्ये सार्थक याचा मृत्यू झाला तर समर्थ हा जखमी झाला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.