दि.०२(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भलतंच घडलंय. एकाचं जागेसाठी दोन पक्षांकडून उमेदवारी मिळालेले दोन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 20 ‘ब’ आणि 30 ‘अ’ जागेवर हा पेच निर्माण झालाय.
नीलम म्हात्रे यांना प्रभाग 20 मधील ब जागेसाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेकडून एबी फॉर्म घेतले तसेच संदीप गायकवाड यांना प्रभाग 30 मधील ‘अ’ जागेसाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेनं ही एबी फॉर्म घेतले. आता या दोघांनी एकाचं पक्षाचे एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं. मात्र या दोघांनी दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म दाखल केले आणि छाननीमध्ये दोन्ही अर्ज वैध ठरलेत. त्यावेळी या दोघांकडे एका पक्षाचा एबी फॉर्म मागे घेण्याची वेळ होती. मात्र या दोघांनी ती प्रक्रिया राबवली नाही. त्यामुळं या दोघांकडे अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत (2 जानेवारी, दुपारी 3 पर्यंत) एका पक्षाची उमेदवारी मागे घेण्याचा पर्याय असेल. जर त्यांनी तसं केलं नाही तर शेवटी याचा निकाल निवडणूक आयोग लावेल. 2 जानेवारीच्या दुपारी तीननंतर निवडणूक आयोग या दोघांनी सर्वात आधी ज्या पक्षासाठी अर्ज आणि एबी फॉर्म दाखल केला, त्या पक्षाची उमेदवारी गृहीत धरेल. मग त्यावेळी या दोघांकडे कोणता पर्याय शिल्लक नसेल. त्यामुळं अर्ज माघार घेण्याच्या मुदतीपूर्वी या दोघांना एकाचं पक्षाची निवड करण्याची संधी मिळणार आहे.











































