दि.३०-राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या विलीनीकरणाची दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडल्यावर अंतिम निर्णय घेण्याचे ठरले होते, असा दावा राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी केला.
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी अजित पवारांचीही इच्छा होती. त्या संदर्भात आमच्या बैठका झाल्या होत्या. अलीकडेच माझी व अजित पवारांची भेट झाली. त्यानंतर आमच्या पक्षाचे काही नेते व अजित पवारांची भेट झाली होती, असे जयंत पाटील यांनी सांगितले. एकत्र येण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पुणे व अन्य महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढलो होतो. जिल्हा परिषद निवडणूकही आम्ही एकत्र लढत आहोत.असेही पाटील म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यावर विलिनीकरणाचा निर्णय घेण्याचे ठरले होते, असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले. महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आघाडी करून लढलो होतो. जिल्हा परिषदेतही आमची पुण्यासह काही ठिकाणी आघाडी झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू झाली होती, असेही शिंदे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षांच्या विधानांवरून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.दादा गटातील काही नेत्यांचा विरोधदोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला अजित पवार गटातील काही नेत्यांचा विरोध असल्याचे समजते. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार पुढील प्रक्रिया केली जाऊ शकते. अजित पवारांच्या अकाली निधनाने विलीनीकरणाची प्रक्रिया काही काळ लांबणीवर पडू शकते. अर्थात, खासदार सूनेत्रा पवार व अजितदादांच्या दोन मुलांची भूमिका यात निर्णायक असेल.






































