दि . ९ ( पीसीबी ) – तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले पडली आता सर्व मतभेद विसरून काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार हे दोघेही पुन्हा एकत्र येत असल्याचे संकेत मिळाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवार यांच्या भूमिकेपासून वेगळं होत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर “ओरिजनल” राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, याबाबत दोन्ही नेते न्यायालयात गेले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्येही दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले. मात्र, अलीकडेच शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले, तर त्यात काहीही आश्चर्य वाटू नये, असं त्यांनी सूचित केलं आहे. अजित पवार यांच्या बरोबर असलेले दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह सुप्रिया सुळे हे सर्व नेते एकाच सुरात बोलू लागल्याने आता लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजले.
शरद पवार म्हणाले की, भविष्यात एकत्र यायचं की नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावं. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे. जरी आमची माणसं वेगवेगळ्या पक्षांत विभागली गेली असली, तरी विचारधारा मात्र एकच आहे. दिल्लीतील आमचे खासदार एकाच विचाराने जोडलेले आहेत. राज्यातील काही आमदारांना वाटतं की मतदारसंघातील विकासकामं मार्गी लावण्यासाठी अजित पवारांसोबत जाणं गरजेचं आहे. मात्र, यासंबंधीचा निर्णय मी देणार नाही. हा निर्णय त्यांनाच एकत्र बसून घ्यावा लागेल. एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी चर्चेने निर्णय घ्यावा. पक्ष उभारणीच्या काळात जे लोक माझ्यासोबत होते, तेच आज वेगवेगळ्या बाजूंना गेले आहेत, पण त्यांची विचारधारा अजूनही एकसारखी आहे. त्यामुळे भविष्यात हे सर्व एकत्र आले, तर मला त्यात काहीच आश्चर्य वाटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आता शरद पवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ म्हणाले की, यापूर्वी आम्ही शरद पवार यांच्याशी बोललो होतो, तेव्हा पवार साहेब हेच म्हणाले तुम्हाला काय करायचे ते करा. मी काय आता त्या प्रक्रियेत नाही, असे ते म्हणाले होते. आताही ते हेच म्हणताय. अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी ठरवावे मी त्यात नाही. आता कोणाची ईच्छाशक्ती किती आहे? हे लवकरच समजेल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास दुधात साखर मिसळल्यासारखं होणार असून आम्हाला आमच्या मतदारसंघात सत्तेजवळ गेल्याने कामे करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे यासाठी आम्ही सर्व आमदार एकत्रितपणे प्रयत्न करू, असे शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. पवार कुटुंब एकत्र येणे ही काळाची गरज असून सध्या आमच्याकडून पराभूत झालेले उमेदवारही मतदारसंघात सत्तेच्या जवळ असल्याचे दाखवत उद्घाटने करत फिरत असतात. मात्र निवडून आलेल्या आमच्यासारख्या आमदारांना मतदारसंघातील कामे करणे अडचणीचे ठरत असल्याने आता जर दोन राष्ट्रवादी एकत्रित झाली तर याचा फायदा आम्हा सर्वांनाच होईल. त्यामुळे साहेबांशी आम्ही याबाबतीत बोलून आमच्या भूमिका सांगू, असे अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.
शरद पवार गटाच्या दहा आमदारांपैकी चार आमदार हे सोलापूर जिल्ह्यातले असून यातील उत्तम जानकर वगळता इतर तीन आमदार हे अजित पवार गटाच्या आमदारांचा पराभव करून विजयी झालेले आहेत. त्यामुळे याची काही अडचण जाणवेल का? असे विचारले असता अजितदादा हे नेहमीच पक्ष न बघता मदत करतात आणि आम्ही ज्या ज्या वेळी त्यांना कामासाठी भेटलो त्यावेळी त्यांनी आम्हाला मदतच केल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात अभिजीत पाटील हे माढ्यातून नारायण आबा पाटील हे करमाळ्यातून आणि राजू खरे हे मोहोळ मतदार संघातून अजित पवार गटाचा पराभव करीत निवडून आले होते. माळशिरस मतदारसंघातून विजयी झालेले उत्तमराव जानकर हे भाजप उमेदवाराचा पराभव करून विजयी झाले होते. सध्या तरी राष्ट्रवादीच्या या चारही आमदारांना सत्तेच्या जवळ जायचे असून यात उत्तम जानकर नारायण पाटील आणि अभिजीत पाटील हे आघाडीवर असल्याचे दिसत आहे.