पिंपरी, दि. १७ चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पक्षाच्या वतीने त्यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा प्रस्ताव पवार यांना दिला. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा कामठे यांनी केला आहे.
महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला पार पडणार आहे. मतदानासाठी अवघे २९ दिवस बाकी असताना शहरात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली. पक्षप्रवेशाबरोबरच, पॅनल जुळवणी, युती आणि आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले. मंगळवारी दिवसभर पुणे येथील बारामती हॉस्टेलवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेऊन रणनीती आखली. सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडीमधून एकत्रित लढण्याचा प्रस्ताव दिला.
दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, मनसे व रासप हे पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवावी. यामुळे भाजपला रोखण्यात यश येईल. त्यामधून महाविकास आघाडीची महापालिकेत सत्ता स्थापन करता येईल, असा प्रस्ताव पवार यांना दिला आहे. याबरोबरच शहरातील विविध प्रभागांमधील महाविकास आघाडीची ताकद, तुल्यबळ उमेदवारांची यादी व निवडणुकीची गणिते कामठे यांनी मांडली.
महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एकत्रित लढण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकाच विचाराचे आहेत. शाहू, फुले, आंबेडकर विचारांशी एकरूप असलेल्या पक्षासोबत नैसर्गिक आघाडी असते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्यास त्याचा फायदाच होईल असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे शहराध्यक्ष
तुषार कामठे यांनी सांगितले.













































