दोन्ही राष्ट्रवादी एक होणार असल्याची चर्चा, नवी दिल्लीतील घडामोडींना वेग

0
58

नवी दिल्ली, दि. 12 (पीसीबी)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (दि.12) 85 वा वाढदिवस आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांची भेट घेतली होती. अजित पवार यांनी भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत.
सध्या अमित शाह आणि शरद पवार दोघेही संसदेत आहेत. संसदेतच अमित शाह शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये शरद पवारांना अमित शाहांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. आज सकाळीच अमित शाहांनी शरद पवारांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात – संजय शिरसाट
आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार कुटुंबियांसह त्यांना भेटायला गेले होते, त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. “आता महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकते. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात” असं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास आमचं काहीही नुकसान होणार नाही असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीनंतर अखंड राष्ट्रवादीच्या चर्चा सुरु
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवारांची 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात सर्वांनीच भुवया उंचावल्याचं पाहिला मिळालं. या भेटीमुळे पुन्हा एकदा अखंड राष्ट्रवादीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवारांची आज सकाळी दिल्लीत भेट घेतली. प्रथमदर्शनी ही वाढदिवसानिमित्त भेट घेतली अशी माहिती सांगण्यात येत असली तरी यामागे आगामी काळातील राजकीय समीकरणं असू शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.