नागपूर,दि.११(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले असली तरी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मात्र दोन्ही गटांतील आमदारांसाठी एकच कार्यालय राहणार आहे. या माध्यमातून उपमुख्यममंत्री अजित पवार गटाच्यावतीने आम्ही एकत्रच असल्याचा संदेश दिला जात असल्याचे समजते.
या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. मंत्री, आमदारांचे कक्ष सजवले जात आहेत. विधानभवन परिसरात आमदारांना बसण्यासाठी पक्षनिहाय स्वतंत्र कार्यालय दिले जाते. मागील अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांना स्वतंत्र कक्ष देण्यात आले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी यावरून मोठा वाद झाला होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा घेतला होता. हा वाद अध्यक्षांपर्यंत गेला. त्यानंतर एकाच कक्षाचे विभाजन करण्यात आले होते.
मात्र, आपसात वाद होऊ नये म्हणून नंतर उबाठाच्या आमदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात घेता अजित पवार आणि शरद पवारांच्या गटासाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात येतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र अद्याप एकाही गटाने स्वतंत्र कार्यालयाची मागणी केलेली नाही. त्यामुळे शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना एकाच कार्यालयात बसून कामकाज करावे लागणार आहे.
सध्या राष्ट्रवादी कोणाची यावरून मोठा वाद सुरू आहे. प्रकरण न्यायालयात गेले आहे. दोन्ही गटांच्यावतीने शपथपत्र सादर केले जात आहे. आमचीच राष्ट्रवादी खरी असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अलीकडे सुनील तटकरे यांनी नागपूरमध्ये बोलताना अजित पवार गटालाच पक्षचिन्ह मिळेल, असा दावा केला.