दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाची धक्कादायक कबुली

0
231

पुण्यात सध्या अपघात प्रकरणामुळे राजकारण खूप तापलं आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे 3 वाजता एक धक्कादायक घटना घडली. व्यावसायिकाच्या 17 वर्षीय मुलाने आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या मुलाचे नाव वेदांत अग्रवाल असं आहे. या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघा जणांनी आपले प्राण गमावले आहे. या घटनेनंतर वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.

यासोबतच अल्पवयीन वेदांत हा बार आणि पबमध्ये गेला होता. त्यावेळी प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, व्यवस्थापक सचिन काटकर, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशातच आता यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, गाडी चालवून दोघांना उडवल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यात त्याला जामीनही दिल्याने हा संताप अजूनच वाढला. अशात या मुलाने एक मोठी कबुली दिली असून त्यामुळे त्याचे वडील गोत्यात सापडले आहेत.

अल्पवयीन आरोपीने पोलिसांसमोर मोठी कबुली दिली आहे. “मी कार चालविण्याचे कसलेही प्रशिक्षण घेतलेले नाही, तसेच माझ्याकडे वाहन चालविण्याचा परवाना देखील नाही, तरी देखील वडिलांनीच ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली. तसेच मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचे देखील वडिलांना माहिती आहे.”, असं या आरोपी मुलाने सांगितलं आहे.

या प्रकरणात असं समोर आलंय की, आरोपी मुलाने जी कार चालवली ती विनाक्रमांकाचीच होती.पोर्शे कार बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन पुणे येथे आणण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती पोर्शे कार अजूनपर्यंत रजिस्टर नव्हती. त्यामुळे ही कार तब्बल इतके दिवस विना रजिस्टर रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पुणे पोलिसांवर देखील मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे