देहूरोड मिलीटरी स्टेशनमध्ये एक लाख वृक्षांचे रोपण

0
408

देहूरोड, दि. २६ (पीसीबी) – देहुरोड मिलीटरी स्टेशन येथे वृक्षारोपण करून दोन वर्षे देखभालीचे काम वनविकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका 7 कोटी 68 लाख रूपये खर्च करणार आहे.

लष्कराच्या देहुरोड मिलीटरी स्टेशन येथे एक लाख वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. तसेच या वृक्षांची दोन वर्षे देखभाल आणि संरक्षणाचे काम करावे लागणार आहे. राज्याच्या नगरविकास विभागाच्या 31 जुलै 2015 रोजीच्या निर्णयानुसार, सन 2015 पासून शहरी भागात हरित शहर योजना कार्यान्वित करण्यासाठी केल्या जाणा-या उपाययोजना आणि कार्यवाहीचे कामकाज राज्य वनविकास महामंडळामार्फत करावे, असे कळविले आहे.

त्या अनुषंगाने हे काम प्रति रोप 768 रूपये 11 पैसे याप्रमाणे राज्य वनविकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. हे काम विनानिविदा थेट पद्धतीने केले जाणार आहे. त्यासाठी 7 कोटी 68 लाख 10 हजार रूपये खर्च होणार आहे.