देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार

0
71

नवीन डीपीआर मंत्रीमंडळासमोर, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) पिंपरी, – पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा नवीन डीपीआर तयार झाला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर असून त्याला मान्यता देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच मान्यता दिली देण्याची ग्वाही दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

खासदार बारणे यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महामार्गावरील वाकड, ताथवडे येथील वाहतुकीची समस्या त्यांना सांगितली. रस्त्याचे काम करण्याची मंत्रालयाची संपूर्ण तयारी आहे. परंतु, या रस्ते कामाचा जुना ठेकेदार सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळे रस्त्याला विलंब होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 मावळ लोकसभा मतदारसंघातून जात आहे. देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रुंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. वाहतुकीची ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा सुधारीत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार डीपीआर तयार झाला आहे. देहूरोड ते चांदणी चौक हे काम पूर्ण करण्याची आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी रिलायन्सला दिली होती. परंतु, या मार्गावरील काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. अनेक ठिकाणी अर्धवट काम आहे. देहूरोड आणि वाकड पर्यंतचे क्षेत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येत आहे. वाकड ते चांदणी चौकापर्यंतचे क्षेत्र पुणे महापालिका हद्दीत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड ते चांदणी चौक (पुणे) दरम्यान 12 अंडरपास आणि उड्डाणपूल आहेत. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. ती सोडविण्यासाठी या रस्ताचा सुधारीत डीपीआर बनविण्यात आला आहे. रावेत ते चांदणी चौक रस्ता विकसित करण्याबाबतचा डीपीआर अंतिम मान्यतेसाठी मंत्रीमंडळ बैठकीसमोर आहे. त्याला मान्यता देण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली. नवीन डीपीआरला लवकरच मान्यता मिळेल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. वाहतूक कोंडीची समस्या संपेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.