देहुरोड येथील आयुध निर्माण कारखान्याच्या परिसरातील २००० यार्ड्स परिसर प्रतिबंधित क्षेत्र (रेडझोन) उठवावा- आ. उमाताई खापरे

0
210

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – देहुरोड येथील आयुध निर्माण कारखान्याच्या परिसरातील २००० यार्ड्स परिसर प्रतिबंधित क्षेत्र (रेडझोन) उठवावा, अशी मागणी भाजपच्या आमदार उमाताई खापरे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सुचनेद्वारे केली.

आपल्या निवेदनात खापरे म्हणाल्या, देहुरोड येथील आयुध निर्माण कारखान्याच्या परिसरातील २००० यार्डस क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून १३/१२/२०२२ रोजीच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे तडवळे, किवळे, रावेत, चिखली, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरी वस्त्या बाधित होत असून ही गावे स्वतंत्र पूर्व काळापासून अस्तित्वात आहेत. नागरी वस्त्या मोठ्या प्रमाणात विकसित होत असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्र एमआयडीसी, एसईझेड, विविध प्रकल्पासाठी जमिनीचा वापर होत असल्याने ७/१२ उताऱ्यावर रेडझोनचे शिक्के मारले आहेत.

त्यामुळे लाखो शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच लहान मोठे उद्योगांना अडचणी येत आहे. मा.ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री पुणे तसेच मा. ना. श्री. उदय सामंत, उद्योगमंत्री यांनी सभागृहात आश्वासित केले की, मा. केंद्रीय संरक्षण मंत्री, भारत सरकार यांच्या समवेत तातडीने बैठक लावून त्या बैठकीस संरक्षण विभागाचे अधिकारी, महसुल विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश करून बैठक घेण्यात यावी. जेणे करुन तडवळे, रावेत, किवळे, चिखली, पिंपरी-चिंचवड येथील रहिवाशांच्या समस्या निराकारण होईल, असेही खापरे म्हणाल्या.