देश भांडवलदारांच्या चाकरीतून सोडवूयात – इम्रान शेख

0
299

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – भांडवलदारांच्या पाठबळावर पैशाच्या जोरावर निवडून दिलेली सरकार पाडली जात आहेत. जातीपातीत विष कालवले जात आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत चालला आहे. सत्ता,न्याय व्यवस्था भांडवल दारांची गुलाम झालेली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी वीर भगतसिंग यांच्या कार्याचा आणि विचारांचा अभ्यास करून सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी व्हायला पाहिजे. वीर भगतसिंग यांच्यासारखं समाजात परिवर्तन घडवण्यात सिंहाचा वाटा घेतला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहीद भगतसिंग यांची 115 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या हस्ते वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणिस दिपक गुप्ता, अनुज देशमुख, शहरसचिव ओम क्षिरसागर, अनिकेत आवारे, मेंनेजमेंट सेल चे अध्यक्ष अकबर मुल्ला, अपंग सेल चे अध्यक्ष अशोक कुंभार, सुधाकर कांबळे, नागेश काळे, दीपक गायकवाड,सुनीता काळे,धनाजी तांबे,सुनील आडागळे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

इम्रान शेख म्हणाले, “भगतसिंग त्यांच्या सोबतच्या तरूणांना एक गोष्ट नेहमीच सांगत असत कि तुमच्या ज्ञानाचा उपयोग जर इथल्या श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी आणि शोषित समाजासाठी होत नसेल तर, त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी होत नसेल तर तुम्ही शिकूनही अक्कलशून्य आहात , तुमच्या ज्ञानाला काहीच किंमत नाही. आजची परिस्थिती पाहताना स्वतंत्र भारतात जे काही घडत आहे ते वीर भगतसिंग यांनी स्वातंत्र्य पूर्ण काळातच ओळखले होते. त्यांच्या मते ज्या पद्धतीने स्वातंत्र्याचा लढा लढला जातोय,त्याने देशाला गोऱ्या इंग्रजांच्या कडून स्वातंत्र्य तर मिळेल परंतु इथले भांडवलदार काळे इंग्रज आपल्यावर राज्य करतील वीर भगतसिंग यांचे ते विधान आज तंतोतंत खरे ठरल्याचे दिसून येते, आज इथला खूप मोठा वर्ग भांडवलदारांच्या चाकरीत अडकला आहे”.