देशाला खूप चांगल्या विरोधी पक्षाची गरज – नरेंद्र मोदी

0
156

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – निवडणुकीचं वर्ष होतं काहीतरी नवं घेऊन समोर यायचं. आज विरोधी पक्षाची जी अवस्था झाली आहे ना त्याला सर्वाधिक कोण जबाबदार असेल तर काँग्रेस. काँग्रेसला दहा वर्षात विरोधी पक्ष म्हणूनही मोठं होता आलं नाही. विरोधात इतरही तेजस्वी लोक आहेत. मात्र त्यांची उमेद घालवण्याचंही कामही काँग्रेसने केलं. तरुण पिढीला पुढे जाऊ दिलं नाही. काँग्रेसने विरोधी पक्षाचं, स्वतःचं, संसदेचं आणि देशाचं खूप मोठं नुकसान केलं. देशाला खूप चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. देशाने घराणेशाहीची खूप मोठी किंमत मोजली, काँग्रेसलाही ती किंमत मोजावी लागली. अधीररंजन चौधरींची अवस्था आपण पाहतोच आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

एकच प्रॉडक्ट वारंवार लाँच केलं जातं आहे
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडला. मल्लिकार्जुन खरगे हे लोकसभेतून राज्यसभेत गेले. एकच प्रॉडक्ट वारंवार लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला कुलुप लागायची वेळ आली आहे. दुकान आम्ही म्हणत नाही. काँग्रेसचे लोक स्वतःच म्हणत आहेत. आमचं दुकान आहे याचा उल्लेख यांचेच लोक करतात. असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’ शब्दावर टीका केली. आम्ही घराणेशाहीची चर्चा करतो कारण जो पक्ष कुटुंब चालवतं, कुटुंबातल्या लोकांनाच प्राधान्य देतं. कुटुंबच सगळे निर्णय घेतं त्याला आम्ही घराणेशाही म्हणतो. लोकशाहीत हे योग्य नाही. राजकारणात एका कुटुंबातले दहा लोक आले तरीही काहीच प्रश्न नाही. पण ते त्यांच्या प्रतिभेवर आणि लोकांनी दिलेल्या मतांवर निवडून आलेले हवेत, लादलेले नकोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. कुटुंब किंवा विशिष्ट घराणंच जेव्हा पक्ष चालवतं तेव्हा घराणेशाहीचा प्रश्न आहे. आम्हालाही वाटतं की या विषयावर चर्चा केली गेली पाहिजे. घराणेशाहीचं राजकारण हा सगळ्यांच्या चिंतेचा विषय असला पाहिजे. एखाद्या कुटुंबातले दोन काय दहा लोक प्रगती करत असतील तर मी स्वागत करेन. प्रश्न हा आहे की घराणंच जिथे पक्ष चालवतात. लोकशाहीसाठी हे संकट आहे. काँग्रेस एका कुटुंबातच गुरफटून गेलेला पक्ष. लोकांच्या आशा-अपेक्षा काय आहेत याच्याशी त्यांना घेणंदेणं नाही. काँग्रेसमध्ये कॅन्सल कल्चर निर्माण झालं आहे. काहीही करा, सगळं कॅन्सल. मेक इन इंडिया म्हटलं की काँग्रेस म्हणतं कॅन्सल. आत्मनिर्भर भारत, काँग्रेस म्हणतं कॅन्सल. नवं संसद भवन, काँग्रेस म्हणतं कॅन्सल. या सगळ्या गोष्टी मोदींनी उभ्या केलेल्या नाहीत या देशाच्या आहेत.

काँग्रेसने तिरस्कार पसरवला
काँँग्रेस तिरस्कार पसरवण्याचंच काम करतं आहे. राष्ट्रपतींनी विकसित भारताच्या रोड मॅपवर चर्चा केली. अर्थव्यवस्थेचे आधारस्तंंभही त्यांनी सांगितले. भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचं जग कौतुक करतं आहे. जी२० समिटमध्ये जग आपल्या देशाबाबत काय विचार करतं हे सगळं जगाने पाहिलं आहे. आज आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे म्हणून आपला देश अर्थव्यवस्थेची प्रगती साधतो आहे. त्यामुळेच मी म्हटलं आहे की आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली क्रमांक तीनची अर्थव्यवस्था असलेला देश होणार आहे. ही मोदींची गॅरंटी आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.