नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी इंडिया टीव्ही सीएनएक्सनं हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणाचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. पुन्हा तिसऱ्यांदा भाजपचे मोदीराज निर्विवादपणे बहुमताने सत्तेत येणार आहे. सर्व विरोधा पक्षांनी मिळून तयार केलेल्या INDIA आघाडीचा निव्वळ फुसका बार ठरणार असल्याचे हे सर्वेक्षण सांगते आहे.
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात. असं झाल्यास मोदी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याच्या विक्रमाची बरोबरी करतील. सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला प्रचंड बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. एनडीए आघाडीला 318 जागा मिळू शकतात. तर विरोधी पक्षांच्या इंडियाला 175 जागा मिळतील, तसेच इतर पक्षांना 50 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झाल्यास, विरोधकांच्या इंडियाला 24.9 टक्के मतं मिळण्याची अपेक्षा आहे. इतर पक्षांना 32.6 टक्के जास्त मतं मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 42.5 टक्के मतं मिळू शकतात. स्वबळावर जागा मिळवण्याबाबत बोलायचं झाल्यास काँग्रेसला 66 जागा मिळतील, तर भाजपला स्वबळावर 290 जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र, सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार भाजप आणि एनडीए या दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये घट होणार असल्याचं बोललं जातंय.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या, तर भाजप एकट्यानं 303 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या तुलनेत आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला 35 आणि भाजपला 13 जागा कमी पडण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात काँग्रेसच्या जागा वाढण्यार असल्याचं समोर आलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 52 जागा मिळाल्या होत्या. तर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला वाढीव 14 जागा मिळण्याची शक्यता आहे.