देशात व राज्यात पिंपरी चिंचवडला प्रभावी भुमिका मांडता यावी, यासाठी प्रयत्न सुरू !

0
288

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची माहिती

हिंजवडी येथील सिम्बॉयसीस कॉलेजच्यावतीने आयोजित “इन्फ्राब्लेझ २०२३” कार्यक्रमात मांडली शहर विकासाची संकल्पना

पिंपरी, दि. १० (पीसीबी)-  देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासात पिंपरी चिंचवड शहराचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर याठिकाणी मोठी औद्योगिक क्रांती झाली. आयटी हब, दळणवळणाचे साधन तयार झाल्याने पायाभुत सुविधा मिळाल्या. मोठे उद्योग उभे राहिल्याने देशपातळीवर शहराचे नाव घेतले जाते. देशात व महाराष्ट्रात प्रभावी भुमिका मांडता यावी, याकडे पिंपरी चिंचवडची वाटचाल सूरू आहे, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी व सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट च्यावतीने हिंजवडी कॅम्पस येथे इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट कमिटीद्वारे “इन्फ्राब्लेझ २०२३” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. प्रसंगी, संचालिका (SCMHRD) डॉ. नेत्रा नीलम, उपसंचालक डॉ. के. राजगोपाल, विभाग प्रमुख डॉ. केदार भागवत यांच्यासह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट, बिझनेस अॅनालिटिक्स, फायनान्स, मार्केटिंग या एमबीए स्पेशलायझेशनचे विद्यार्थी उपस्थित होते.

“इन्फ्राब्लेझ २०२३” ची थीम ‘भारताचे व्हिजन फॉर $ 5 ट्रिलियन इकॉनॉमी’ होती. कार्यक्रमाचे उदघाटन रोपांना पाणी देऊन करण्यात आली. स्मार्ट सारथी अॅप, आर्थिक पैलू आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतर उपक्रमांद्वारे महापालिका पायाभूत सुविधांबद्दल आयुक्त शेखर सिंह यांनी विचार मांडले.

आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांना संबोधत केले. ते म्हणाले की, पायाभुत सुविधांमुळे भारताची अर्थव्यवस्था आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने गेल्या 20 वर्षांत शहराचा भरमसाठ विकास झाल्याचे सांगत महापालिकेच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेला महाराष्ट्रातील प्रभावी महानगरपालिका बनवण्याच्या दृष्टीकोनाविषयी देखील त्यांनी माहिती दिली.

महापालिकेने हाती घेतलेल्या हरित उपक्रमांवर आणि प्रदेशातील शाश्वत विकासासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकत विविध आयटी पायाभूत सुविधांशी संबंधित उपक्रमांसोबत पीसीएमसी स्मार्ट सारथी उपक्रमाची शहरातील लोकांसाठीची सोय त्यांनी स्पष्ट केली. पीसीएमसी क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. बिग डेटा अॅनालिटिक्स आणि एआय वापरून घेतलेल्या स्मार्ट उपक्रमांबद्दलची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, संस्थेच्या संचालक डॉ. नेत्रा नीलम, डॉ. केदार भागवत यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थी, प्राध्यापकांशी संवाद साधताना आयुक्त शेखर सिंह यांनी विकासाची संकल्पना स्पष्ट केली. SCMHRD चे उपसंचालक डॉ. के. राजगोपाल यांनी आभार मानले.