देशात परिवर्तन करण्याची शक्ती युवकांमध्ये : बी. व्हि. श्रीनिवास

0
390

सावरकर विचार धारेचे समर्थन नाही : कृष्णा अल्लावरू
पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची विभागीय आढावा बैठक संपन्न

पिंपरी,दि. ३१(पीसीबी) – देशात परिवर्तन करण्याची शक्ती युवकांमध्येच आहे. २०१४ पासून केंद्रात आलेल्या भाजपा सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, महागाई मध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. नागरिकांमध्ये याविषयी तीव्र असंतोष आहे. सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यांना “मदतीचा हात चोवीस तास” या उपक्रमातून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मदत करावी. “माझा गाव माझी शाखा” या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने पिंपरी, काळेवाडी, विजयनगर आणि वाकड शाखेचे आज उद्घाटन झाले आहे. त्याप्रमाणे सर्व वॉर्ड मध्ये, वाडी वस्तीवर युवक काँग्रेसच्या शाखा सुरू करून नागरिकांशी संवाद साधून त्यांना काँग्रेसची विचारधारा सांगा. या उपक्रमातील उत्कृष्ट शाखांना दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तुम्ही संघटनेत काम करत रहा, संघटना तुमच्या कार्याची नोंद नक्कीच घेत असते. ह्याचे उदाहरण मी स्वतः आहे. मी काम करत राहिलो आणि माझ्या कामाची पावती म्हणून मला पक्षाने युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष बनविले. ज्याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्हि. श्रीनिवास यांनी केले.

पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व विधानसभा अध्यक्ष यांची आढावा बैठक शुक्रवारी (दि. २९ जुलै) पिंपरी चिंचवड येथील हॉटेल रागा पॅलेस येथे झाली. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावारू आणि भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग, सहप्रभारी प्रतिमा मुदगल, वंदना बेन,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, युवक काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र प्रभारी व प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन साठे, गौतम आरकडे, शहर युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष सायली नढे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना बी. व्ही. श्रीनिवास यांनी ‘गाव तिथे शाखा’ या युवक काँग्रेसच्या महत्वकांक्षी उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावारू मार्गदर्शन करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला स्वाभिमानी महाराष्ट्र. कधीही इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकर विचारधारेचे समर्थन करणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी तयारी करावी. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या ‘मिशन १०००’ या उपक्रमांतर्गत उमेदवारांना निवडून येण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यरत आहे असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावारू यांनी केले .

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वजित कदम मार्गदर्शन करताना म्हणाले की, युवक काँग्रेसचा मी प्रदेशाध्यक्ष होतो, त्यामूळे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी माझे एक वेगळे नाते आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही कुठेही मला बोलवावे मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही यावेळी माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी दिली.या बैठकीत सर्वांनी युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील कामाबद्दल समाधान व्यक्त केले व यापुढे आणखी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग, सहप्रभारी प्रतिमा मुदगल, सहप्रभारी वंदना बेन, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, प्रदेश सचिव सचिन साठे आदींनीही मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे, गौतम अरकडे, शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम , महिला शहर अध्यक्ष सायली नढे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, स्वप्नील बनसोडे, वासिम शेख, विशाल कसबे, सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके आदींनी संयोजनात सहभाग घेतला होता.