दिल्ली , दि. २९ (पीसीबी) -गाव व शहराबाहेर राहणाऱ्या नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सेवेसाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. लवकरच याबाबतची यंत्रणा कार्यान्वीत होणार असल्याचे सुतोवाच निवडणूक आयोगाकडून मिळाले आहेत.
त्यामुळे नागरीकांना देशातील कुठल्याही कोपऱ्यातून आता मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यांकडून मते मागवली आहेत आणि ही मते ३१ जानेवारीपर्यंत राज्यांना लिखीत स्वरूपात निवडणूक आयोगाला पाठवायची आहेत.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा फायदा लाखो भारतीयांना होणार आहे. नोकरी किंवा शिक्षणासाठी परराज्यात राहणाऱ्या भारतीयांना याचा विशेष फायदा होईल. त्यासाठीच निवडणूक आयोगाने हा पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांना आता मतदानासाठी घरी यावं लागणार नाही.
त्यांना रिमोट व्होटींगच्या आधारे आता भारतातून कुठुनही मतदान करता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने एक प्रोटोटाईप रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन विकसीत केले असून याचा नमुना दाखवण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना आमंत्रित देखील केले आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरीकास मतदानाचा अधिकार असतो. याचा १८ वर्षे पूर्ण केलेल्या तसेच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या प्रत्येक नागरीकास या सेवेचा फायदा घेता येणार आहे. या व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय मतदानात या सुविधेच्या आधारावर मतदान करू शकणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरांतून होत आहे.













































