पुणे, दि. १७ ऑगस्ट (पीसीबी) – ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देशातील 22 अधिकारी हे बोगस प्रमाणपत्र देवून युपीएससीची परीक्षा पास झाल्याचा दावा केला आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर विजय कुंभार यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. या 22 अधिकाऱ्यांचं नाव असणारी एक ‘युपीएससी फाइल’ नावाचं डॉक्युमेंट सोशल मिडियावर फिरत असून या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी युपीएससी पत्राद्वारे केल्याचं विजय कुंभार यांनी सांगितलं. या 22 जणांच्या यादीत 4 लोक महाराष्ट्रातील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे लोक आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस अशा वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असल्याचं गंभीर वक्तव्य कुंभार यांनी केलंय. ते पुण्यात मध्यमांशी बोलत होते.
मध्यमांशी विजय कुंभार म्हणाले, मध्यंतरी घडलेलं पूजा खेडकर प्रकरण सगळ्यांना माहितीच आहे. त्यांनी बोगस सर्टिफिकेट देऊन परीक्षा दिली. त्यानंतर त्यांचं IAS पद रद्द करण्यात आलं. त्यांच्यावर एफआयआर झाला. त्यानंतर भारतामधून अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध अशा स्वरूपाच्या तक्रारी यायला लागल्या. अनेकांची सोशल मीडियावर नावं येत आहेत. सोशल मीडियावर एक फाईल आहे. ज्याला ‘युपीएससी फाईल’ असं नाव देण्यात आलं आहे. ज्याच्यामध्ये काही आयएएस, आयपीएस आणि इतर पदांवरील 22 अधिकाऱ्यांची नावं आहेत. ज्यांनी खोटे जातीचे दाखले, खोटे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बनावट डीसऍबिलिटी सर्टिफिकेट अशी कागदपत्र देऊन नोकरी मिळवल्या आहेत.
कुंभार पुढे म्हणाले, या संदर्भामध्ये मी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या नावाची चौकशी केली. या संदर्भात मी युपीएससीला पत्र पाठवलं आहे. या सगळ्यांची चौकशी करून या सर्वांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. देशाविरुद्ध युद्ध चालल्यासारखी ही परिस्थिती आहे. कारण युपीएससीकडून घेतली जाणारी आयएएस या पदाची परीक्षा ही सर्वोच्च, सर्वात पारदर्शी आणि सर्वात सुरक्षित अशी सेवा समजली जाते. इथून पास होणारे लोक देशातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे या परीक्षेमध्ये कुठल्याही उणीवेला स्थान नाही. त्यामुळे अशांवर कारवाई करावी.
तसेच या सगळ्यांमुळे जी पात्र मुलं आहेत, ज्यांचा या जागेवर हक्क होता, ज्यांनी मेहनत केली होती, त्यांच्यावर सुद्धा अन्याय झाला आहे. म्हणून या 22 जणांवर कारवाई व्हावी अशी मागणी मी यूपीएससीकडे केली आहे, असं कुंभार म्हणाले.कुंभार यांनी यांच्या म्हणण्यानुसार, बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी असा आहे की ज्याने पायाने अधू आहे असं सांगितलं. त्यानंतर तो एका सीनियर अभिनेत्री बरोबर नाचताना दिसला. इतका गंभीर प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही असं म्हणता येणार नाही. खरंतर हे माहिती असूनही अनेक अधिकाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं.
खोटं सर्टिफिकेट देवून परीक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या या ‘युपीएससी फाइल्स’ मध्ये पुण्यातील एका अधिकाऱ्याचं नाव आहे. तसेच महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. प्रत्यक्षात ते महाराष्ट्रात काम करत नाहीत. मात्र ते मूळचे महाराष्ट्रातील आहे, असा गंभीर दावा कुंभार यांनी केला.
कुंभार म्हणाले, निश्चितपणे यूपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परंतु याच्यातून यूपीएससीने स्वतःलाच बाहेर काढायचं आहे. यूपीएससीला इतर कोणीही वाचवायला येणार नाही. त्यांनी आपल्या परीक्षा पद्धती आणि निवड पद्धतीमध्ये बदल करून संस्थेला पूर्वीचं वैभव आणि विश्वासार्हता प्राप्त करून देणं गरजेचं आहे.