देशातील सर्व तीर्थ ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे हभप यशोधन महाराज साखरे यांचे विचारः आळंदीत जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन

0
45

आळंदी, दि. 27 (पीसीबी) : “आळंदी ही ज्ञानाची भूमी आहे. हे तीर्थ क्षेत्र मानवाला भवसागरातून पार करून परमार्थाकडे घेऊन जाते. त्यामुळेच देशातील सर्व तीर्थ क्षेत्र हे ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे या उद्देशाने डॉ. विश्वनाथ कराड अविरत कार्य करीत आहेत. ते सहिष्णुतेचे खरे आदर्श व्यक्तीमत्व आहेत.” असे विचार हभप यशोधन महाराज साखरे यांनी व्यक्त केले. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधन पर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी श्री क्षेत्र देहू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, आळंंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश काका वडगावकर, अशोक उमरगेकर, विठ्ठलराव काळोखे, बाळासाहेब काळोखे व गणपतराव कुर्‍हाडे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच सौ. उषा विश्वनाथ कराड, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण उपस्थित होते.

हभप यशोधन महाराज साखरे म्हणाले,” सहिष्णूता ही व्यापक असून त्यात विश्व चिंतनाचा समावेश आहे. यामुळे सर्व तीर्थ क्षेत्र हे ज्ञान तीर्थ व्हावे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहचविण्यासाठी कार्य करावं. आळंदीत ज्ञान, नाद, विज्ञान आणि ब्रह्म याची अनुभूती होते. येथील घाटांची निर्मिती करण्यास करण्यास डॉ. कराड यांनी जे सोसले ते पाहता ते खरे सहिष्णूतेचे आदर्श आहेत.” प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”जगातील सर्व तीर्थ हे ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे या दिशेने कार्य करीत आहोत. अहंकाराचा वारा न लागो अंगी या नुसार आळंदी, देहू, पंढरी ते देवभूमी बद्रीनाथ येथे घडलेले कार्य हा माऊलीचा प्रसादच आहे. विनम्रता, श्रध्दा, भक्ती आणि कर्मयोग हे याचेच फलीत आहे. बद्रीनाथ येथील सरस्वती मंदीराजवळ स्वर्गारोहणाचा मार्ग बनून नवा इतिहास घडला आहे.”

त्यानंतर डॉ. संजय उपाध्ये, सुरेश काका वडगावकर यांनी विचार मांडले.
डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी प्रस्तावना केली व नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.