देशाचे गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले

0
324

जयपूर, दि. ८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने तर 400 प्लसचा चंग बांधत प्रत्येक मतदारसंघात मोर्चेबांधणी मेगा प्लॅनिंग सुरू केले आहे. मात्र, या निवडणुकांआधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यांच्याकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. याचवेळी राजस्थानमध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी जात असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे थोडक्यात बचावले.

भाजप आणि काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेशसह पाचही राज्यांच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मंत्री, नेते सभा, रॅली, बैठका, मेळावे यांच्याद्वारे मतदारांपर्यंत पोहाेचविण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचारासाठी जात असताना मोठा अनर्थ टळला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले.
नागौरच्या परबतसरमध्ये ही घटना घडली. गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील बिडियाड गावातून छोटी सभा घेतल्यानंतर रथात बसले. सभास्थळी जात असताना, त्यांचा रथ विजेच्या तारांना धडकला. यानंतर ठिणगी उडाली आणि तार रस्त्यावर पडली. त्यानंतर रथ थांबवण्यात आला आणि शाह यांना दुसऱ्या वाहनातून रवाना करण्यात आले.