देशाची सत्ता सोपविल्यास पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद होऊन देशाची फाळणी

0
168

भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या नावाने कलंकित इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेचे स्वप्न पाहात आहे. काँग्रेसला पुन्हा सत्तेची मलाई खायची आहे. त्यासाठी त्यांची पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याची तयारी आहे. त्यांच्या हाती एवढ्या मोठ्या देशाची सत्ता सोपविल्यास देशात पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद होऊन देशाची फाळणी होईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची होम मैदानावर जाहिर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दुपारच्या तळपत्या उन्हात सुमारे ७५ हजारांचा जनसमुदाय या सभेला हजर होता.

देशात ‘चारसौ पार’ करून पुन्हा भाजपच्या हाती सत्ता आल्यास देशाचे संविधान बदलण्याची भीती व्यक्त होत असताना त्याबाबत थेट उल्लेख टाळून पंतप्रधान मोदी यांनी दलित, भटके विमुक्त जाती-जमाती, ओबीसी घटकांच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही दिली. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने ६० वर्षात दलित, आदिवासी, ओबीसींचा जेवढा विकास केला, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी विकास मागील दहा वर्षात आपल्या नेतृत्वाखालील सरकारने केल्याचा दावाही त्यांनी केला. विकासापासून वंचित राहिलेल्या या वर्गाला मोफात धान्यासह निवारा, पाणी, वीज, शिक्षण, शौचालय, स्वयंपाक गॕस आदी सुविधा सेवक म्हणून आपण करू शकलो. गोरगरिबांच्या विकासासाठी नीती साफ असेल तर त्याचे दृश्य परिणामही तेवढेच साफ ठरतात, हेच आपण दाखवून दिल्याचा दावा मोदी यांनी केला. मागील दहा वर्षात भाजपने देश चालविताना दलिताला राष्ट्रपतिपदाची संधी दिली. नंतर देशाच्या इतिहासात प्रथमच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनविले.

देशात दलित, आदिवासीचे सर्वाधिक आमदार व खासदार भाजपचे आहेत. दलित, आदिवासी आणि ओबीसींबरोबर आपले मनापासून नाते आहे. म्हणूनच मागील दहा वर्षात सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून या वर्गाला आम्ही ताकद दिली. याउलट काँग्रेसची या वर्गाबद्दलची खोटी नियत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबू जगजीवनराम यांच्यासारख्या दलित नेत्यांना काँग्रेसने सदैव अवमानित केले. काँग्रेसने दलित-आदिवासींचा नेहामीच आवाज दाबला आणि विश्वासघात केला, असा आरोप मोदी यांनी केला. आपल्या ३१ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी कर्नाटकात काँग्रेस सरकारने अल्पसंख्याक समाजाला दिलेल्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर बोट ठेवत, धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने दलित, आदिवासी आणि ओबीसी वर्गाला साथ देण्याची हाक दिली.