देशभर गाजलेलं संतोष पाटील आत्महत्या प्रकरण, पोलिसांकडून भाजपच्या माजी मंत्र्यांना क्लीन चिट

0
313

बंगळुरू, दि. २१ (पीसीबी):: बेळगावी येथील कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी उडुपी शहर पोलिसांनी बुधवारी भाजपचे माजी मंत्री केएस ईश्वरप्पा यांना क्लीन चिट दिली आहे. तपास पथकाने बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधी न्यायालयात 1,890 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे, ज्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तपासात ईश्वरप्पा यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे नमूद केले आहे.

पाटील यांना धमकावल्याच्या आरोपावरून मंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या ईश्वरप्पा यांच्याविरोधात आपल्याकडे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असेही उडुपी पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ रेकॉर्डिंग, मोबाईल मेसेज, बँक स्टेटमेंट्स, कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स आणि रेकॉर्ड केलेले स्टेटमेंट न्यायालयात सादर केले आहेत.

मंत्री ईश्वरप्पा यांची प्रतिक्रिया –
“पोलिसांनी या प्रकरणी बी-रिपोर्ट दाखल केल्याचे जाणून मला खूप आनंद झाला. मी चौंडेश्वरी देवीला वचन दिले होते की, मी काहीही चुकीचे केले नाही. पोलिसांचा अहवाल हे विरोधकांना चोख प्रत्युत्तर आहे. मी राजीनामा दिला होता. पण आता वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती मी स्वीकारेन, असे ईश्वरप्पा म्हणाले.

विरोधी पक्ष काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर दबाव आणल्यानंतर ईश्वरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर पाटील यांच्या पत्नीने नुकतेच राज्यपालांना पत्र लिहून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. तपासावेळीच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी ईश्वरप्पा निर्दोष म्हणून बाहेर येणार असल्याचे प्रमाणपत्र दिले होते, अशी खोचक प्रतिक्रिया या क्लोजर रिपोर्टवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी दिली.

काय आहे प्रकरण –
पंचायत राज मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर संतोष पाटील नावाच्या ठेकेदाराने ‘कमिशन’ मागितल्याचा आरोप केला होता. यानंतर पाटील यांनी आत्महत्या केली. उडुपी येथील एका खासगी लॉजच्या खोलीत पाटील यांचा मृतदेह आढळून आला. पाटील यांनी एका व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यासोबतच त्यांच्या मृत्यूसाठी ईश्वरप्पा यांना जबाबदार धरले होते. स्वत:ला भाजपचा कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या पाटील म्हणाले होते की, त्यांनी आरडीपीआर विभागात काम केले होते. तसेच त्यांना त्याचा मोबदला हवा होता. मात्र, ईश्वरप्पा त्यांना 4 कोटींच्या कामासाठी 40 टक्के कमिशन मागत होते, असा आरोप त्यांनी केला होता.