मुंबई, दि. 30 (पीसीबी) : माजी आमदार आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे उमेदवार अनिल गोटे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अनिल गोटे यांची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आठ दिवसात दुसरी भेट आहे. या भेटीनंतर अनिल गोटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी धनगर असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला. याचं सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. मराठा समाजाला न्याय मिळावा हे मी आमच्या समाजालाही सांगितलं आपला आणि मराठा समाजाचा प्रश्न एकच आहे, असं अनिल गोटे म्हणालेत.
मी देवेंद्र फडणवीस यांच्या या गोष्टीला कंटाळून एक वर्ष अगोदर आमदारकीचा राजीनामा दिला. मी त्यांना सांगितलं तुम्ही भले काही करा पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. राजकारणात फसवा – फसवी आणि धोकेबाजी हा पायंडा त्यांनी पाडला आहे, असं अनिल गोटेंनी म्हटलं पाच वर्षे धनगर समाजाला लटकवत ठेवलं, फक्त विधानसभेत ठराव करून दिल्लीला पाठवायचा होता. ज्यावेळेस अहवाल आला त्यावेळेस मात्र त्यांनी दाबून ठेवला हे बाहेर आलं नाही. ते म्हणाले मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवला धनगराचा प्रश्न नाही सोडवला तरी चालेल इतका कपटी माणूस आहे. मनोज जरांगे पाटील एक चांगला प्रामाणिक आंदोलक आहे. देवेंद्र फडणवीस राजकारणातला शकुनी मामा आहेत, असंही अनिल गोटे म्हणालेत.
धुळे शहर मतदार संघात भाजपचं आव्हान अनिल गोटेंसमोर आहे. यावर त्यांनी भाष्य केलं. मी काही ते आव्हान मानत नाही. भाजपंचा जो उमेदवार आहे त्यांचा एकच कार्यक्रम आहे. माल दाखवा माल कमवा…, असं अनिल गोटे म्हणाले. शिवसेना ठाकरे नाराजी असल्याची चर्चा होत आहे. त्यावरही गोटेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ती नाराजी दूर होणार नाही, कारण त्यांना नाराजीच्या मागे एक मोठी व्यक्ती आहे. त्यांना शिवसेना एकत्रित राहिलेली नको हे मी उद्धवजींना सांगितलं आहे, असं त्यांनी म्हटलं.