देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी ?

0
101

मुंबई, दि. ३० जुलै (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. विद्यमान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच दिल्लीत जाऊन मोदींची सपत्नीक भेट घेतली. त्यामुळे भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे सोपवली जाणार का, अशी चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातून नागपूरकर नितीन गडकरी यांच्यानंतर फडणवीस यांना हा सन्मान मिळत असल्याने भाजपच्या वर्तुळात उल्हास आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेलं नाही. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. भाजपच्या जागा २३ वरुन ९ वर आल्या. याची जबाबदारी घेत फडणवीसांनी राजीनामा देऊ केला होता. पण तो पक्ष नेतृत्त्वानं स्वीकारलेला नाही. त्यांच्याच नेतृत्त्वात भाजप विधानसभेची निवडणूक लढणार आहे. राज्यातलं सरकार चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तीन पक्षांमध्ये समन्वय राखण्याचं काम फडणवीस करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांशी देवेंद्र फडणवीसांचे चांगले संबंध आहेत. नागपूरचे असलेले फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलोख्याचे संबंध राखून आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नड्डा यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून लवकरच मोकळं करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.