देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का !

0
330

अमरावती, दि. २८ (पीसीबी)- निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील राजकीय भेटीगाठींना वेग आला आहे. नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली, त्यातच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी भेट घडली आहे. शरद पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत नाराज असलेल्या नेत्याची भेट घेतली आहे.

शरद पवारांनी कुणाची घेतली भेट?-
शरद पवार सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चांदूरबाजारमध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली. बच्चू कडू यांनी स्वतः शरद पवार यांना घरी येऊन चहापाण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे अमरावती दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी देखील बच्चू कडू यांच्या विनंतीला मान देत बच्चू कडू यांच्या घरी हजेरी लावली.

बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते, मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यावेळी बच्चू कडू यांनी देखील एकनाथ शिंदे यांना साथ देत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, त्यांना भाजप-शिवसेना सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र ते खरं ठरलं नाही, त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या.

दरम्यानच्या काळात बच्चू कडू यांची नाराजी जाहीरपणे पहायला मिळत होती. सरकारसोबत सत्तेत सामील होणाऱ्या बच्चू कडूंनी कालांतराने सरकारवर जाहीर टीका करायला सुरुवात केली, त्यांच्या या भूमिकेमुळे ते पुन्हा महाविकास आघाडीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता थेट शरद पवारांना घरी येण्याचं निमंत्रण दिल्याने आणि त्यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केल्याने हा बच्चू कडूंचा नवा इशारा मानला जात आहे.

बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत जाणार का?
बच्चू कडू यांना शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले की आमच्यात विविध राजकीय सामाजिक विषयांवर चर्चा झाली. जास्त करुन शेतीवर चर्चा झाली. बैठकीत झालेली सर्व चर्चा उघड करायची नसते, तेवढे तारतम्य ठेवावे लागते, असं म्हणत त्यांनी या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची कबुली दिली, मात्र ती उघड करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

दरम्यान, बच्चू कडू यांची नाराजी याआधी लपून राहिलेली नाही, त्यात चांदूर बाजारमध्ये शरद पवारांच्या स्वागताचे फ्लेक्स लागले होते, शरद पवार यांची राजकीय जाण संबंध देशाला ठावुक आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत बच्चू कडू शरद पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा रंगली आहे. असं असेल तर महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल.