देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात साम्य किती…

0
504

पुणे, दि. २२ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस आहे. संपूर्ण राज्यभरात या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांचं मोठे जाळ आहे. त्यामुळे दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये मात्र या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

पुण्यातील अलका चौकात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे समोरासमोर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. एका बॅनरमध्ये एकच पालक अजित पवार असे लिहिलेल आहे, तर देवेंद्र फडवणीस यांच्या बॅनरवर निष्कलंक नेतृत्व निर्विवाद कर्तुत्व असा मजकूर आहे. अगदी समोरासमोर लावण्यात आलेल्या या बॅनर नंतर आता राजकीय क्षेत्रासह पुण्यात चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पुण्यामध्ये मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चढावोढ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. सत्ता बदल झाल्यानंतर पुण्याचा पालकमंत्री कोण? यावर मोठी चर्चा होत आहे. यामध्ये पुण्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येत आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपला डिवचले आहे. ‘बैठका होतील…ताफा दिसेल पण अशी धडाडी तिथे नसेल,एकच पालक ‘ असा मजकूर लिहीत राष्ट्रवादीने फडणवीसांनी लक्ष केले आहे.

फडणवीस आणि पवार या दोन नेत्यांमध्ये अनेक अर्थाने साम्य आहे. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमत्री म्हणून एकाच वेळी शपथ घेतली होती. विरोधी नेते म्हणून दोघांनीही खुर्ची सांभाळली. काल पवार उपमुख्यमंत्री होते आता फडणवीस आहेत. दोघांच्या पक्षात दोघेही अव्वल स्थानावर आहेत. दोघांचीही प्रशानावर पकड कायम आहे.