देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये – अजित पवार

0
236

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – मुख्यमंत्रीपदावरुन सत्तेतल्या तिन्ही पक्षांच्या समर्थकांची रस्सीखेच सुरु आहे. जो तो आपलाच नेता मुख्यमंत्री पाहिजे, अशी विधानं करत आहे. त्यातच गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केलं आहे.अजित पवार यांनी सत्तापक्षाला समर्थन दिल्यापासून तेच मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा सुरु आहेत. प्रत्येकवेळी एखादी तारीख चर्चिली जाते पण पुढे काही होत नाही. मागच्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाच्या समर्थकांकडून मुख्यमंत्री पदाबाबत जाहीरपणे भाष्य केलं जात आहे.अजित पवार गटाच्या समर्थकांनी मागे बॅनरबाजी करत भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा घडवून आणली होती. तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की, देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं आणि एकनाथ शिंदेंना राज्यात ठेवावं.

त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे समर्थक फडणवीसांना मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून विधानं करु लागले आहेत.गुरुवारी माध्यमांशी बोलताना थेट अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक विधान केलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असं विधान केलं होतं. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये. बावनकुळे यांनी काय बोलावं, हा त्यांचा अधिकार आहे. शेवटी जनताच निर्णय घेत असते. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झालं तर वाईट वाटण्याचं कारण नाही” असं अजित पवार म्हणाले. या विधानामुळे खरंच देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला पवारांचं समर्थन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे