देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हालाही आहे, तुमच्या परिवाराचे व्हॉट्सअॅप बाहेर येत आहेत

0
292

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : “आम्ही पाटण्याला विरोधी नेत्यांच्या बैठकीला गेलो, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे परिवार बचाओ बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हालाही आहे, तुमच्या परिवाराचे व्हॉट्सअॅप बाहेर येत आहेत” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला. मुंबईतील ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी-शाखाप्रमुख यांचा शिवाजी मंदिर नाट्यगृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करत होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“एक जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहोत. कोव्हिड काळातील भ्रष्टाचार हे बाहेर काढत आहेत. पण त्या काळात सातत्याने सर्व्हे होत होते, मी माझं कौतुक सांगत नाही, पण त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देशात सर्वोत्तम कामगिरी करत असल्याच सर्वेक्षणांचं निरीक्षण होतं. ही यांची पोटदुखी आहे. कारण भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचं नाव या यादीत नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“ठाकरे कुटुंबीयांना धक्का… काल आपले उपमुख्यमंत्री… यांच्या मनात किती आपली भीती… काल आम्ही पाटण्याला गेलो होतो, तर फडणवीस म्हणाले, हे परिवार बचाओ बैठकीला गेले आहेत, देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हालाही आहे, तुमच्या परिवाराचे व्हॉट्सअॅप बाहेर येत आहेत, आम्ही त्यावर बोललो नाही. बोललो तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल. दुसरं कुठलंही आसन तुम्हाला झेपणार नाही, पडून राहावं लागेल… योगा डे…” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आमच्या परिवारावर बोलू नका. मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे. हा माझा परिवार आहे.. माझा सुरज चव्हाण, शिवसैनिक, महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरं कोणी घेत असेल तर माहिती नाही. परिवार बचाओ वगैरे बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत.” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

देवेंद्रजी, तुम्ही तुमचं घर सांभाळा, आमच्या घरापर्यंत येऊ नका, नाहीतर आम्हाला तुमच्या घरात जावं लागेल, नाहीतर हिंदूत्वाची अब्रू निघेल, असा इशारा भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी दिला.