पिंपरी, दि. १९ “दृढनिश्चयाने केलेले काम म्हणजे संकल्प होय. त्यासाठी एक जानेवारी अथवा गुढीपाडवा अशा मुहूर्तांची गरज नसते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न!’ या प्रवचनमालिकेंतर्गत ६४वे प्रवचनपुष्प गुंफताना ‘संकल्पाला नवीन वर्षच का?’ या विषयावर डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. माजी नगरसेवक मधू जोशी, किरण येवलेकर, सुदाम शिंदे, गीतल गोलांडे, ॲड. अंतरा देशपांडे, सुप्रिया सोळांकुरे आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, “‘संकल्प’ या शब्दातील ‘सं’ हे अक्षर सातत्याचे द्योतक आहे. त्यामुळे संकल्पाला सातत्याची जोड असलीच पाहिजे. वास्तविक प्रत्येक दिवस हा नवा दिवस असतो; तसेच दररोज झोपेतून जाग आल्यावर आपला पुनर्जन्म होत असतो. त्यासाठीच त्या दिवशी त्या क्षणाला घेतलेला निर्णय महत्त्वाचा असतो. आपले आयुष्य संकल्पाने भारून टाकायचे की, विकल्प शोधायचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते. संकल्पासोबत आपले नाते अद्वैत स्वरूपाचे हवे. त्यासाठी निश्चयात्मक बुद्धी पणाला लावावी लागते; तसेच त्यासाठी मेंदू आणि मन यांची एकवाक्यता झाली पाहिजे. संकल्प करण्याआधी सर्व संभाव्य शक्यतांचा अभ्यास केला; तर त्याच्या सिद्धीची ग्वाही मिळते. आपले शरीर हेच एक न्यायालय आहे अन् त्यातील न्यायाधीश आपण स्वतःच असतो. अर्थातच त्यामुळे आपले व्यक्तिगत यश आपल्या स्वतःच्या आचरणात दडलेले असते. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय अशी त्या संकल्पित यशाची व्याप्ती वाढली पाहिजे. आपल्या जगण्याचे प्रयोजन ओळखून संकल्प करून त्यासाठी निग्रहाचा आग्रह धरा म्हणजे सर्व ग्रह तुमच्या संकल्पाभोवती फिरतील. दृढनिश्चयाने संकल्प फलद्रूप करूया आणि आयुष्य सुंदर करूया!” असे आवाहन आपल्या मिस्कील शैलीतून डॉ. उपाध्ये यांनी विविध संदर्भ, किस्से, उदाहरणे उद्धृत करीत निरूपणातून केले.
प्रवचनापूर्वी, अनिल देशपांडे यांनी सुश्राव्य हिंदी चित्रपटगीतांचे सुरेल सादरीकरण केले. प्रशांत मोरे यांनी श्रोत्यांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. अवधूत गौतम, महेश गावडे, नवनाथ सरडे, गणेश बर्गे, राजेंद्र गवते, ज्ञानेश्वरी भुजबळ, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.