दृकश्राव्य माध्यमाच्या वापराने शिक्षण अधिक रंजक होईल… दिग्दर्शक-निर्माते मिलिंद लेले यांचे प्रतिपादन

0
170

पुणे, दि. १७ (पीसीबी) – शालेय शिक्षणात दृकश्राव्य माध्यमांचा वापर झाल्यास शिकण्याची प्रक्रीया अधिक रंजक होईल. याचा विचार करून नविन शैक्षणिक धोरण राबविताना नियोजन झाले पाहिजे असे मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते मिलिंद लेले यांनी व्यक्त केले.

विद्या भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वार्षिक आढावा बैठकीत ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी विद्या भारतीचे माहिती पत्रक आणि संकेतस्थळ यांचे प्रकाशन केले. विद्या भारतीचे क्षेत्र शिशुवाटिका प्रमुख भाई उपाले, प्रांताध्यक्ष डॉ. अरुणराव कुलकर्णी, प्रांत मंत्री रघुनाथ देवीकर आणि प्रचार विभाग प्रमुख राजन वडके उपस्थित होते.

चित्रपट क्षेत्रात भारतीयत्वाचा विचार रुजवण्याची आणि वाढविण्याची गरज मिलिंद लेले यांनी व्यक्त केली. त्यानुसार भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेच्या (एफ टी आय आय) अभ्यासक्रमाच्या बदलासाठी विद्या भारतीने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

विद्या भारती – अखिल भारतीय शिक्षा संस्थान या संघटनेची वार्षिक आढावा बैठक पुण्याच्या व्हि आर रुईया मूक बधिर विद्यालयात पार पडली. पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. गेल्यावर्षभरात जिल्हा स्तरावर झालेल्या विविध कामांचा आढावा या बैठकीत मांडण्यात आला.
यावेळी मिलिंद लेले यांच्या हस्ते विद्या भारतीचे संकेत स्थळ तयार करणारे यश भावसार यांचा सत्कार करण्यात आला.  प्रांताचे सह मंत्री दादासाहेब काजळे यांनी बैठकीचे सुत्र संचालन केले.