दुर्गा टेकडीचा विकास करताना नागरिकांच्या सूचनांचा विचार केला जाईल -आयुक्त शेखर सिंह यांचे

0
16

-‘दुर्गा टेकडी उद्यान डिझाईन विचारसरणी कार्यशाळा’ उत्साहात

*पिंपरी, दि . २३ ,- ‘दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करताना निसर्गाचे संवर्धन करण्यास महत्त्व दिले जाणार आहे. या विकास कामाच्या अनुषंगाने नागरिकांना सूचना देता याव्यात, दुर्गा टेकडीच्या विकासात नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा व्हावी, यासाठीच ‘दुर्गा टेकडी उद्यान डिझाईन विचारसरणी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. आता या कार्यशाळेत आलेल्या नागरिकांच्या सूचनांवर दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करताना नक्की विचार करण्यात येईल,’ असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागातील दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन असून या अनुषंगाने नागरिकांशी चर्चा करण्यासाठी रविवारी (२३ मार्च) दुर्गा टेकडी येथे ‘दुर्गा टेकडी उद्यान डिझाईन विचारसरणी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, कार्यकारी अभियंता विजय जाधव, विजय भोजने,
उप आयुक्त उमेश ढाकणे, उप अभियंता निखिल फेंडर, कनिष्ठ अभियंता संदीप ठोकळे, अनिल झोडे, उद्यान निरीक्षक अशोक वायकर यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह पुढे म्हणाले की, ‘मागील वर्षी आपण दुर्गा टेकडीवर करावयाच्या विकास कामाबाबत चर्चा केली होती. त्यानुसार कार्यवाही देखील करण्यात आली. आता दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करण्याचे नियोजित असून त्यासाठी या कार्यशाळेत तुम्ही दिलेल्या सूचनांचा विचार केला जाईल. येथील निसर्ग जपत विकास करण्यास प्राधान्य दिले जाईल. पिंपरी चिंचवड शहर ‘अर्बन फॉरेस्ट’ बनवण्याचा उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतला आहे. नुकतेच तळवडे येथे उद्यान उभारले आहे. शहरात आणखी तीन ठिकाणी मोठे वन उद्यान बनवण्याचे नियोजन आहे,’ असेही आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

यावेळी आयुक्त सिंह यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. या चर्चेमध्ये वास्तूविशारद राहुल कादरी, वाईड अँगल फोरमच्या प्रिया गोखले, पर्यावरण शिक्षण विभागाच्या संस्कृती मेनन, सतीश आवटे, वीर मास्टर यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी नागरिक आदींनी सहभाग घेतला. कार्यशाळेनंतर दुर्गा टेकडी येथील पार्किंग व्यवस्था, डॉल्फिन पार्क आदींची पाहणी सिंह यांनी केली.

मॉर्निंग वॉक’ करताना आयुक्तांशी संवादाची मिळाली संधी

दुर्गा टेकडी डिझाईन कार्यशाळा सुरू होण्यापूर्वी येथील नागरिकांना ‘मॉर्निंग वॉक’ करताना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. महानगरपालिकेच्या ‘सीएचडीसी’ प्रकल्प अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी आयुक्तांसोबत विविध विषयांवर मनसोक्त संवाद साधला.