दुबईत अडकले मराठी कुटुंब

0
1

अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात इराणविरोधात युद्ध सुरू असून त्यात महाराष्ट्रातील काही प्रवासी अडकले आहेत. त्यामध्ये सात वर्षांची एक मुलगीही आहे. या कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा मुद्दा उपस्थित केला असून महाराष्ट्रातील या कुटुंबियांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आखाती देशांत असलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन जाहीर केली आहे.

बाहेर जाण्यास मनाई
सुरुवातीला आम्ही राहत असलेल्या परिसरात काही ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर आम्हाला ज्या हॉटेलमध्ये ठेवले होते, तेथून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. बाहेर जाण्यास किंवा फिरायला जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. पर्यटकांना बाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमचे उद्या भारतात येण्यासाठी विमान होते; मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे चिंता वाढली आहे, अशी प्रतिक्रिया कलंत्री कुटुंबीयांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.

नाशिक जिल्ह्यातील कुटुंब
हे कुटुंब पर्यटनासाठी संयुक्त अरब अमिरात येथे गेले होते. सध्या ते दुबई शहरातील सुरक्षित ठिकाणी आहेत. त्यांना कुठेही बाहेर जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे कुटुंब नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील आहे. अभिषेक कलंत्री, नम्रता कलंत्री आणि मिराया कलंत्री अशी दुबईत अडकलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांनी मदतीसाठी सरकारकडे विनंती केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून परराष्ट्र मंत्रालयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.