दुचाकीस्वाराचा मोबाईल हिसकावला

0
376

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीचा दोन चोरट्यांनी मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. चोरट्याचा पाठलाग करताना चोरट्यांनी दुचाकीला लाथ मारल्याने दुचाकीस्वार खाली पडून जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. १३) दुपारी एमआयडीसी भोसरी येथे घडली.

जितेंद्र उमेश दास (वय ३६, रा. बिबेवाडी, पुणे. मूळ रा. बिहार) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास दुचाकीवरून कामावर जात होते. ते एमआयडीसी भोसरी मधील एस ब्लॉक येथे आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दास यांचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला. त्यानंतर दास यांनी आरोपींच्या दुचाकींचा पाठलाग केला. त्यावेळी आरोपींनी दास यांच्या दुचाकीला लाथ मारली आणि दास दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्यात ते जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.