दुचाकीला धडक देऊन दोघांना नेले फरफटत; दीड दिवसानंतर मद्यपी कार चालकावर गुन्हा दाखल

0
102

सांगवी, दि. 9 ऑगस्ट (पीसीबी) – पिंपळे गुरव येथे एका स्कोर्पिओ कारने डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीसह दोघांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 7) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी तब्बल दीड दिवसानंतर मद्यपी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.शरद किसन सुरवसे (वय 26, रा. पिंपळे गुरव) आणि मानतेश लिंगाप्पा चीगनुर अशी जखमींची नावे आहेत. शरद सुरवसे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्कोर्पिओ कार (एमएच 14/एलपी 7492) चालक दत्तू रामभाऊ लोखंडे (वय 39, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तू लोखंडे याने मद्य प्राशन करून त्याच्या ताब्यातील कार चालवली. पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिराजवळ आल्यानंतर त्याने शरद सुरवसे यांच्या दुचाकीला (एमएच 14/जेसी 9947) धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीसह शरद आणि मानतेश यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले.या अपघातात शरद यांना मुकामार लागला आहे. तर मानतेश हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळे गुरव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

सांगवी पोलिसांचा अजब कारभार

अपघात झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले. मात्र अपघात प्रकरणी तक्रार नसल्याने पोलिसांनी चक्क कार चालकाला सोडून दिले. दरम्यान, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांच्या हाती लागले. सांगवी पोलिसांनी तब्बल दीड दिवसानंतर गुन्हा दाखल केला. पोलिसांची बाजू जाणून घेण्यासाठी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्याशी अनेकवेळा संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.