दुचाकीला धक्का लागल्याचा जाब विचारल्याने एकावर खुनी हल्ला

0
74

निगडी, दि. 11 (पीसीबी) –

दुचाकीला धक्का लागल्याचा जाब विचारल्याने सहा जणांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना आठ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे घडली.

चंद्रकांत दत्ता बुटे (वय 38, रा. आकुर्डी गावठाण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओम संजय दळवी (वय 22), ओंकार शरद आवंदे (वय 24), गणेश गोरख कुंभार (वय 26), प्रितेश पांडुरंग जाधव (वय 21, सर्व रा. सिद्धिविनायक नगरी निगडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी बुटे यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे बुटे यांनी त्याचा जाब विचारला. या कारणावरून ओम दळवी आणि ओंकार आवंदे यांनी बुटे यांना शिवीगाळ केली. इतर आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून ‘आज चंद्याला जिवंत सोडायचे नाही. लय माज आलाय’ असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. यामध्ये बुटे यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.