निगडी, दि. 18 (पीसीबी)
भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिल्याने रस्ता ओलांडत असलेल्या पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १६) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बर्ड व्हॅली उद्यानासमोर, चिंचवड येथे घडली.
खिलोना देवानंद काळे (वय 54, रा. शंकर नगर, चिंचवड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पद्मनाभन अय्यर (वय ५२, रा. यमुना नगर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी संगणक अभियंता दुचाकीस्वाराचे नाव आहे. निकेश देवानंद काळे (वय 25) यांनी मंगळवारी (दि. 17) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बर्ड व्हॅली उद्यानासमोर फिर्यादी यांची आई खिलोना आणि बहिणीचा मुलगा व मुलगी असे तिघेजण रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या आरोपी पद्मनाभन अय्यर यांच्या दुचाकीने फिर्यादी यांच्या आईस जोरदार धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादी यांच्या बहिणीचा मुलगा व मुलगी हे किरकोळ जखमी झाले. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.