रस्ता ओलांडत असलेल्या पादचारी व्यक्तीला भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 20 मे रोजी साई चौकाजवळ, नवी सांगवी येथे घडला.
मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. याप्रकरणी सहायक फौजदार शशिकांत वाघुले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकी (एमएच 12/एलझेड 1545) चालक प्रभातकुमार रामशंकर सिंग (वय 27, रा. सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी रात्री पावणे दहा वाजता नवी सांगवी येथे साई चौकाजवळ एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला. याबाबत सुरुवातीला सांगवी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असताना एका अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.
20 मे रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास अनोळखी व्यक्ती पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या एका दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.












































