भरधाव जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 8 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास शितळा नगर मामुर्डी येथे घडली.
नगर अली एस के (वय 23, रा. शितळा नगर, मामुर्डी, देहूरोड. मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिराज हुसेन शेख (वय 63, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कौशल कुमार (वय 22, रा. पिंपरी. मूळ रा. बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचे देहूरोड मध्ये चिकनचे दुकान आहे. त्या दुकानात नगर अली हा काम करत होता. रमजान सण असल्याने तो आठ एप्रिल रोजी रात्री सलून मध्ये गेला होता. केस कापून परत येत असताना त्याला कौशल कुमार याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव चालवून धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने नगर अली याचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात कौशल कुमार देखील जखमी झाला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.











































