तळेगाव दाभाडे, दि. १८ (पीसीबी) – आईला दुचाकीवरून घेऊन जात असताना निष्काळजीपणे दुचाकी चालवून दुचाकीचा अपघात केला. त्यात आईचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवारी (दि. 17) सकाळी जुना मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे घडला.
अपर्णा उमेश दिवेकर (वय 53) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार वैभव नलगे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कौस्तुभ उमेश दिवेकर (वय 29, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ आणि त्याची आई अपर्णा दोघेजण दुचाकीवरून जात होते. जुना मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ कॅम्प जवळ कौस्तुभ याने निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघात केला. त्यात आई अपर्णा या गंभीर जखमी होऊन मयत झाल्या. तर कौस्तुभ हा जखमी झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.











































