दीर-भावजय समेट,शंकर जगताप हेच भाजपचे उमेदवार ?

0
225

 चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे भरते

चिंचवड, दि. २२ ऑगस्ट(पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात तमाम भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील दीर-भावजय वादात खरोखर समेट झाल्याने संघर्ष टळला आहे. लक्ष्मणभाऊंच्या धर्मपत्नी आमदार श्रीमती आश्विनीताई जगताप यांनी कुटुंबासाठी मोठे मन दाखवत एक पाऊल मागे घेतल्याचे वृत्त आहे. भाजप उमेदवारीच्या स्पर्धेतून त्यांनी माघार घेतली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग आता एकदम मोकळा झाला आहे. जगताप यांच्या कौटुंबिक वादात राजकारण तापले होते. या वादाचा फायदा मिळेल म्हणून भाजप बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे. आता भाजपचे संभाव्य उमेदवार शंकरशेठ जगताप यांच्या विरोधात कोण लढणार, पुन्हा दुरंगी होणार की बहुरंगी यावर पुढची राजकीय समिकरणे अवलंबून आहेत. दरम्यान, घसरगुंडी सुरू असलेल्या भाजपला या घडामोडीचा फायदा होणार असल्याने निष्ठावंत खूश आहेत.
तब्बल ६ लाख ७७ हजार मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचेच डोळे लागून राहिलेत. २००९ ते २०१९ पर्यंत सलग तीन टर्म आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकहाती विजय मिळविला होता. दीर्घ आजारातून त्यांचे निधन झाले आणि चिंचवडला पोटनिवडणूक झाली. २०१९ मध्ये जगताप यांच्या विरोधात एकवटलेल्या सर्व विरोधकांनी शिवसेनेच्या राहुल कलाटे यांना घोड्यावर बसवले होते. दुरंगी लढतीत जगताप यांच्या निसटता विजय झाला, पण कलाटे यांनी तब्बल १ लाख १२ हजार मते मिळाली.


पोट निवडणुकितच भाजपचा म्हणजे श्रीमती जगताप यांचा पराभव झाला असता, पण तिथे कलाटे यांनी बंडखोरी दुरंगी नव्हे तर तिरंगी लढत झाली आणि ३६ हजाराने भाजप जिंकली. सहामुभूती श्रीमती अश्विनीताई जगताप यांच्या पथ्यावर पडली, मात्र राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी तब्बल ९९ हजार मते घेतली होती. २०१९ आणि नंतरच्या पोटनिवडणुकिचे समिकरण पाहता जगताप कुटुंबाच्या विरोधातील मते बरोबरीत आहेत.


आता २०२४ मध्ये आमदार आश्विनीताई यांनी पुन्हा संधी मिळावी म्हणून आग्रह धरला होता. कुटुंबाच्या वादात आमदारकी बाहेर जाण्याची शक्यता बळावली होती. इतकेच नाही तर शंकरशेठला भाजपची उमेदवारी मिळाली तर आश्विनीताई या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार असतील आणि पुन्हा आश्विनीताईंनाच भाजपने संधी दिली तर खुद्द शेकरशेठ हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी जोरदार चर्चा रंगली होती. दोघांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात कुटुंबात समेट झाल्याने ते सगळे पेल्यातले वादळ ठरले आहे.


चिंचवडमध्ये भाजपने शंकरशेठ यांना संधी दिलीच तर १५ नगरसेवक पक्ष सोडणार होते. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे यांनी या नगरसेवकांची मोट बांधली होती. काटे यांनी स्वतः भाजपकडे इच्छासुध्दा प्रदर्शीत केलेली आहे. आरोग्य शिबिरांसह विविध उपक्रमांतून काटे यांनी मतदार संपर्क अभियानलाही सुरू केली. आता नेहमीप्रमाणे ते तलवार म्यान करतात की लढतात ते पहायचे.

भाजपचे दुसरे जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी आपल्यालाच संधी मिळणार, असा दावा केला आहे. संघाच्या तसेच भाजपच्या प्रदेश नेत्यांनी जगताप कुटुंबाला पर्याय म्हणून आपल्याला शब्द दिलाय असे सांगत गेल्या दोन महिन्यांपासून मतदारसंघात बैठका, गाठीभेटी, बेरोजगारांसाठी मेळावा असे उपक्रम सुरू केले. कोणत्याही परिस्थितीत लढायचेच असा निश्चय करूनच त्यांनी तयारी सुरू केली आहे. आता नखाते लढणार की थांबणार याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे सर्वात जेष्ठ असलेले माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे ही दोन तगडी नावे उमेदवारीसाठी स्पर्धेत आहेत. भोईर यांनी लढायच्या हेतुनेच थेट प्रचाराला सुरवात केली. वाढदिवसाच्या निमित्ताने दहा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांना प्रचाराचा नारळ फोडला. महायुतीच्या जागावाटपात आताची भाजपच्या ताब्यातील जागा राष्ट्रवादीला मिळण्याची सुतराम शक्यत नसल्याने भोईर यांनी स्वसामर्थ्यावर लढण्यासाठी त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे. पाच टर्म नगरसेवक असलेल्या भोईर यांची उमेदवारी भाजप आणि विशेषतः शंकर जगताप यांच्यासाठी मोठी अडचणीची ठरू शकते. भाजपला कायम जिथे मताधिक्य मिळते त्या चिंचवडगाव परिसरात भोईर यांचे वर्चस्व आहे.

भाजप आणि जगताप यांना चिंचवड प्रमाणेच कायम मतांचे भरभरून दान देणाऱ्या पिंपळे सौदागर मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी भावी आमदार असे फलक लावून वातावरण निर्मिती केली आहे. महायुतीत जगताप कुटुंब सोडून बाहेरचा उमेदवार द्यायचा विचार झालाच तर राष्ट्रवादीत आपला प्रधान्याने विचार होईल, अशी आशा नाना काटे यांना आहे. पोटनिवडणुकित नाना काटे यांनी ९९ हजार मेत घेतल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्यक्षात युतीच्या जागावाटपाचे सूत्र ज्याचा आमदार जिथे तिथे त्या पक्षाचीच ती जागा असे सूत्र ठरलेले आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीला जागा सुटणार नाही, हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत आता नाना काटे काय भूमिका घेणार ते पहायचे.

आजवर तीन वेळा निवडणूक लढलेल्या राहुल कलाटे यांनीपण शड्डू ठोकलेत. खुद्द लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटल्याने दुरंगी लढतीत त्यांनी मोठी मजल गाठली होती. नंतरच्या पोटनिवडणुकित तीन उमेदवार राहिल्याने त्यांचा आलेख घसरला. आजवरची त्यांची चिकाटी पाहून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकित खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शिवसेनेकडूनच त्यांना ऑफर होती, पण त्यांनी नकार दिला. एक भक्कम पर्याय म्हणून कलाटे यांच्याकडे पाहिले जाते. ठाकरेंच्या शिवसेनेशी ते आजही लॉयल आहेत. मध्यंतरी शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेसाठी संधी होती, पण तिथे खो बसला. राष्ट्रवादी शरदचंद पवार पक्षातूनही आजही आमदारकीसाठी त्यांचे नाव चर्चेत आहे.