दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
4848

खोट्या सह्या करून संचालक पदावरून कमी करून व्यक्तीची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील कुरुळी मधील कुबेरा मर्चंट प्रा ली या कंपनीमध्ये उघडकीस आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 ते 19 ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडला.

मनोज शांताराम गायकवाड (वय 43, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश शांताराम गायकवाड (रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, ता. खेड) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुबेरा मर्चंट प्रा ली या कंपनीत संचालक पदावर होते. आरोपींनी त्यांचा खोट्या सह्या करून कंपनीच्या संचालक पदावरून खाली केले. त्यांच्या जागी आरोपी महिलेची निवड करण्यात आली. त्याबाबत फिर्यादी यांनी आरोपी महिलेला विचारपूस केली असता ‘मी तुझ्या सह्या केल्या आहेत व तुझा राजीनामा घेतला आहे. कर्जाची रक्कम मी वापरणार आहे, तुला काय करायचे ते कर’ अशी धमकी दिली. यामध्ये फिर्यादी यांचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.