दीडपट परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 48 लाखांची फसवणूक

0
216

हिंजवडी, दि. ३ (पीसीबी) : गुंतवणूक केलेल्या रकमेवर दीडपट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकाची 48 लाख 50 हजारांची फसवणूक केली. ही घटना 20 मे 2023 रोजी बालेवाडी येथील एका हॉटेल मध्ये घडली. याप्रकरणी 2 डिसेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष ज्ञानेश्वर पिंजण (वय 45, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला, रियान शेख उर्फ राकेश, सम्राट भाई उर्फ सौरभ दुबे, विनय मेहता, आशिक काह्न उर्फ बबलू भाई, सुनील यादव (रा. विश्रांतवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी पिंजण यांना दिशाभूल करणारी माहिती दिली. एका कंपनीत गुंतवणूक केल्यास दीडपट परतावा मिळेल असे आरोपींनी पिंजण यांना आमिष दाखवले. त्यापोटी आरोपींनी पिंजण यांच्याकडून 49 लाख 50 हजार रुपये घेतले. दरम्यान, त्यातील एक लाख रुपये आरोपींनी पिंजण यांना आरटीजीएस द्वारे दिले. उर्वरित 48 लाख 50 हजार रुपये आणि परतावा न देता पिंजण आणि त्यांचा मित्र अफरफ महिरुद्दिन शेख यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.