पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनतर्फे “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६” बाबत जनजागृती कार्यशाळा संपन्न
पिंपरी, दि. २९ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. प्रत्येक नागरिकांमध्ये वेगवेगळी प्रतिभा दडलेली असते. त्याच प्रमाणे दिव्यांग बांधावांमधील प्रतिभा ओळखा, व त्यानुसार त्यांना कामांचे वाटप करा. महापालिकेमधील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांशी विभाग प्रमुखांनी चर्चा करावी, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, त्यानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार त्यांना सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील महत्त्वपूर्ण तरतुदी व माहिती” याविषयी सर्वसमावेशक जनजागृती निमित्त आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, समाज विकास विभाग उप आयुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, एनसीपीईडीपी च्या अमनप्रीत कौर, इनेबल इंडियाचे शिवकुमार नटराजन यांच्यासह महापालिकेचे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त सिंह म्हणाले की , ‘महापालिका अधिकाऱ्यांनी दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ काय आहे, हे या कार्यशाळेच्या माध्यमातून सविस्तर समजावून घ्यावे. त्यानुसार महापालिकेमध्ये काम करणाऱ्या दिव्यांग बांधवांशी संवाद साधावा. त्यानुसार त्यांच्यामधील प्रतिभा ओळखावी, त्यांच्या मर्यादा ओळखा, व त्यानुसार कामांचे वाटप करा. पुढील काळात शहरातील औद्योगिक क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी देखील अशीच प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करा,’ असे देखील ते म्हणाले.
दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी दिव्यांगांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ ची माहिती देण्यासाठी पुढील महिन्यापासून प्रत्येक विभाग निहाय पालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची देखील माहिती दिली.
कार्यशाळेत एनसीपीईडीपी अमनप्रीत कौर, अक्षय जैन, दीक्षा दिंडे, यांनी ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ कायद्यातील तरतुदी’ तर इनेबल इंडियाचे शिवकुमार नटराजन यांनी ‘दिव्यांगाना अडथळा विरहित वातावरण निर्मिती’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज विकास विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे यांनी केले. दिव्यांग भवन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांग भवन फाउंडेशनच्या मानस शास्त्रज्ञ अपर्णा चव्हाण यांनी केले. धनश्री नलावडे व माधुरी गाडेकर यांनी दुभाषक म्हणून काम पाहिले.