दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार

0
16

पिंपरी, दि. ८ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे,तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख व इतर परिसरातील नाल्यांची स्थापत्य विषयक कामे करणे व नालेसफाई करणे, पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनचक्राचे मॅपिंग करणे, प्रभाग क्र. १९ मधील कुकी नाला दुरूस्तीची कामे करणे, महापालिकेचे रस्ते, उद्यान, मोकळ्या जागा याठिकाणी लागवडीसाठी वृक्षारोपणाची रोपे पुरविणे, स्वच्छ भारत मिशन २.० योजनेअंतर्गत मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे गरजू रुग्ण सहाय्यता निधी संस्था सुरू करणे, प्रभाग क्र. २ येथील पेठ क्र. ५/८ येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याकरिता ताब्यात आलेल्या उर्वरित जागेत स्थापत्य विषयक व विद्युत विषयक कामे करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरु केलेल्या ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ उपक्रमांतर्गत नागरिकांना आता अधिक सुलभ पद्धतीने पार्किंग बुक करता येणार आहे. यासाठी खास ‘व्हॉट्सऍप पार्किंग’ ही डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्याने विकसित करण्यात आलेल्या सेवेचे उद्घाटन स्थायी समिती बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

या सुविधेचा वापर करून नागरिक थेट व्हॉट्सऍपवरून वाहन पार्किंग बुक करू शकतात. हे बुकिंग वापरकर्त्याच्या नावाने निश्चित वेळेसाठी ठेवले जाते. वाहन वेळेत पार्क न केल्यास वापरकर्त्याला तत्काळ सूचना पाठवली जाते, आणि ती जागा पुढील नागरिकासाठी खुली केली जाते. शहरातील १० ठिकाणी ही सुविधा कार्यान्वित झाली असून, यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे आणि वाहनतळ (पार्किंग) व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार आहे.