दिव्यांग कलाकारांकडून अद्भूत कलाविष्कार सादर करीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

0
10

: ‘ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर गाजवले अधिराज्य

पिंपरी, दि. १५ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिव्यांग कलाकारांकडून अद्भूत कलाविष्कार सादर करीत दिलेली मानवंदना….महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित गाण्यांवर नृत्य सादरीकरण… भरतनाट्य, कथ्थक, सुफी नृत्य, मार्शल आर्ट यांचा सुरेख मिलाफ असणाऱ्या विलोभनीय नृत्याला मिळालेली दाद… या सर्वांचा अद्भूत संगम असलेला अविश्वसनीय असा ‘ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी (१४ एप्रिल) दिव्यांग कलाकारांचा सहभाग असलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नृत्य संगीतमय विश्वातील अविस्मरणीय कलाविष्कार ‘ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध थेरप्युटिक थिएटर दिग्दर्शक डॉ. सय्यद सलाहुद्दीन पाशा यांच्या ‘मिरॅकल ऑन व्हील्स’ या संस्थेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दिग्गज दिव्यांग कलाकारांचा समावेश होता. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) ॲड. गोरक्ष लोखंडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्य, महापालिका कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सादरीकरण सर्वात प्रथम कलाकारांनी केले. त्यानंतर भरतनाट्य, कथ्थक जुगलबंदी सादर करण्यात आली. यावेळी दिव्यांग बांधवांनी काळजाचा ठेका चुकवणारे मार्शल आर्ट्सवरील नृत्याचे सादरीकरण केले. प्रसिद्ध सुफी गाण्यावर सादर करण्यात आलेल्या सुफी नृत्याने रसिकांची मने जिंकली. राष्ट्रभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करीत उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृती केली. विविध प्रकारच्या नृत्याचे सादरीकरण करतानाच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दिव्यांग कलाकारांकडून मानवंदना देण्यात आली. समता, समरसता, स्वावलंबन व परिवर्तन यांचे प्रभावी संदेश कलाकारांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्मविश्वासाने देत एकप्रकारे आम्ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे देखील दाखवून दिले. या कार्यक्रमाचे निर्माते-दिग्दर्शक डॉ.सय्यद पाशा यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन करत या कार्यक्रमाबद्दल माहिती विषद केली.

प्रेक्षकांकडून मिळाले ‘स्टँडिंग ओव्हेशन’

दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून ‘स्टँडिंग ओव्हेशन’ मिळाले. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांची दाद देत उभे राहून कलाकारांचे कौतुक केले. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी कलाकारांसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. ‘ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ हा कार्यक्रम अविश्वसनीय, अविस्मरणीय असाच होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमुळे असा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळाल्याच्या भावनाही प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात आल्या.