दिव्यांगाना कृत्रिम अवयव मोफत वाटप शिबिर

0
299

तळेगांव, रविवार, दि. 29 (पीसीबी) – रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो व रोटरी क्लब ऑफ पुना एअरपोर्ट, साक्षी मशीन अँड टूल्स प्रा. लि.,भारत विकास परिषद कोथरूड व पिंपरी चिंचवड यांच्या सहयोगाने दिव्यांगासाठी अत्याधुनिक पद्धतीचे कृत्रिम पाय व हात आणि कॅलिपर प्रदान कार्यक्रम वं. ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान, तळेगांव दाभाडे, ता.मावळ, जि. पुणे येथे रविवार दिनांक २८ मे २०२३ रोजी संपन्न झाला.

या मध्ये ७८ लाभार्थीनी नोंदणी केली होती. त्यांचे कृत्रिम पाय व हात बनविण्याचे काम भारत विकास परिषदेच्या विकलांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांनी केले. श्री विनयजी खटावकर, विश्वस्त तथा केंद्र प्रमुख, विकलांग पुनर्वसन केंद्र यांनी लाभार्थीशी संवाद साधला. अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पायाची किंमत बाजारात ₹ ५० हजार पेक्षा जास्त असून असे अवयव मोफत देणारी भारतामध्ये ‘भारत विकास परिषद’ ही एकमेव संस्था आहे. २०२२-२३ या वर्षात ३००० पेक्षा जास्त लाभार्थीनी याचा फायदा घेतला आहे. गरज भासल्यास कृत्रिम अवयवाची देखभाल व दुरुस्ती केंद्रातर्फे मोफत केली जाते असेही नमूद केले. या कृत्रिम अवयवांचे वैशिष्ट्य असे कि त्याची सांध्यामध्ये हालचाल होते व व्यक्ति पूर्वी प्रमाणे चालू शकते.

कृत्रिम अवयव प्रदान श्री दत्ताजी चितळे,भा वि प, राष्ट्रीय कार्यकारिणी सभासद, श्री अनिरुद्धजी तोडकर, भा वि प, क्षेत्रीय सचिव-संस्कार, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्री विवेक कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ पुना एअरपोर्टचे अध्यक्ष श्री मोहिनीश थडानी, श्री किशोरजी गुजर, वित्त सचिव, भा वि प, पश्चिम क्षेत्र, डॉ रामचंद्र आपटे, अध्यक्ष भा वि प, पिंपरी चिंचवड व श्री प्रदीप ओक, अध्यक्ष भा वि प कोथरूड यांचे हस्ते करण्यात आले.

श्री दत्ताजी चितळे यांनी विकलांग व्यक्तिंना कृत्रिम अवयव मिळाल्याने ते स्वतः आर्थिक दृष्ट्या कसे सक्षम होतात व खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभे रहातात हे सांगितले. तसेच विकलांग पुनर्वसन केंद्र करीत असलेल्या कार्याचा आढावा घेतला व जास्तीतजास्त लाभार्थी पर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्यासाठी आवाहन केले.

रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो व रोटरी क्लब ऑफ पुना एअरपोर्ट, साक्षी मशीन अँड टूल्स प्रा. लि., इलोव्हेंट हेल्थ यांनी दिलेल्या भरघोस देणगीतून लाभार्थीना कृत्रिम अवयव मोफत देण्यात आले. भारत विकास परिषदेच्या पिंपरी चिंचवड व कोथरूड शाखेच्या सभासदानी लाभार्थी पर्यंत पोहोचण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. डॉ रामचंद्र आपटे यांनी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले.