दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध

0
2

: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन, जिल्हा नियोजन समितीत दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधी देणार

पिंपरी दि. 18 (पीसीबी) : ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटत आहे. दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्याचे काम सरकार करेल. त्यांना सक्षम बनविण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी विविध पावले उचलण्यात येतील. दिव्यांगांच्या कल्याणासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीतील ठराविक निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करावा, याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल,’ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ याकाळात ‘पर्पल जल्‍लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय सचिव राजेश अगरवाल, पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, माजी महापौर योगेश बहुल, माजी नगरसेवक नाना काटे, प्रशांत शितोळे, संजय काटे, राजू मिसाळ, डब्बू आसवानी, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे तानाजी नरळे, परेश गांधी, विजय कान्हेकर, अभिजित मुरुगकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी अजित पवार म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पर्पल जल्लोष कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे मला समाधान मिळाले. असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. पर्पल जल्लोष हा उत्सव दिव्यांगांसह समाजातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी पाहावा, अनुभवा असा महाउत्सव आहे. तर समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी, राजकीय कार्यकर्त्यांनी पाहावा, असा उत्सव आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

..
जिल्ह्यानुसार दिव्यांगांच्या योजनांचा आढावा घेण्यात येईल

‘राज्यामध्ये जवळपास एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के दिव्यांगांची संख्या आहे. दिव्यांग व्यक्तींची एकूण संख्या किती आहे, याची आकडेवारी संकलित करून योजनांचा आढावा घेऊन आखणी करण्यात येईल,’ असे सांगतानाच अजित पवार पुढे म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महापालिकेने दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम सुरू केले आहे. दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन केले तर ते कर्तृत्वाचे शिखर सहज गाठू शकतात, हे पर्पल जल्लोष सारख्या कार्यक्रमातून दिसून येत आहे. दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम समाज म्हणून आपल्या सर्वांचे आहे,’ असेही ते म्हणाले.

याप्रसंगी केंद्रीय सचिव राजेश अगरवाल यांनी केंद्र सरकारकडून दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी परांजपे स्किमचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, युनिसेफचे संजय सिंह, अभिनेते दर्शिल सफारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करताना दिव्यांगांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची तसेच दिव्यांग भवनाची माहिती दिली. दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. धनंजय भोळे यांनी केले.

दिव्यांगांसाठी निधीची तरतूद करणार

‘मार्च महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल. याशिवाय जिल्हा नियोजन समितीतून विविध योजनांसाठी निधी दिला जातो. आगामी काळात राज्यातील ३६ जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमधील निधीचा काही भाग हा केवळ दिव्यांगांसाठी खर्च केला जावा,यासाठी प्रयत्न करण्यात येईल. याशिवाय राज्याने सुरू केलेल्या दिव्यांग कल्याण विभागासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याबाबत देखील प्रयत्न केले जातील,’ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दिव्यांगांच्या प्रमाणपत्राबाबत महत्त्वाची घोषणा

‘सध्या पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दिव्यागांना प्रमाणपत्र दिले जात आहे. ससून रुग्णालयात देखील प्रमाणपत्र दिले जाते. उपजिल्हा रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी आवश्यक ते निर्देश देणार आहे,’ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, रोजगार कार्यक्रम घेणे, आरोग्य उपाययोजना करणे, यावरही भर दिला जाईल,’ असेही ते म्हणाले.
…..

चौकट

‘पर्पल जल्लोष’ उपक्रमाचे केले कौतुक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी ‘पर्पल जल्लोष’ उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमात असणारे स्वयंसेवी संस्थाचे स्टॉल, प्रदर्शन यांना भेट दिली. या कार्यक्रमात नवनवीन गोष्ट पाहण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच असा कार्यक्रम केवळ दिव्यांगांसाठी मर्यादित न ठेवता, याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.