पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा….
कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी ई वाहनाचे वितरण….
पिंपरी, ३ डिसेंबर २०२५ : दिव्यांग नागरिकांना सबलीकरण, स्वावलंबन आणि सन्मानाची वागणूक देण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका करत आहे. समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांग कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचे काम सुरू आहे. कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, शिक्षण-सुविधा आणि पथदर्शी कल्पनांमुळे दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास अधिक दृढ होत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात नवीन योजनांचे उद्घाटन व विविध उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच विशेष प्राविण्य प्राप्त दिव्यांग नागरिक व विद्यार्थी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख (माजी आयएएस), यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, यांच्यासह महापालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, सोनाली नवांगुळ,डॉ. विना तारकुंडे, संगीता जोशी यांच्यासह शहरातील दिव्यांग बांधव, त्यांचे पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांगांच्या क्षमतांचा विकास होण्यासाठी प्रशासन, संस्था आणि नागरिक यांचे एकत्रित योगदान अत्यावश्यक आहे. आपल्या पदाच्या माध्यमातून सर्व दिव्यांग नागरिकांना समावेशक आणि न्याय देण्याच्या आपल्या बांधिलकीची नव्याने जाणीव करून देण्याची संधी मिळते, याचा मला आनंद होत आहे तसेच दिव्यांग कलाकारांनी आज रंगमंचावर सादर केलेली कला ही केवळ त्यांच्या मेहनतीचे नव्हे तर त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रतिभेला प्रोत्साहन द्यावे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.महापालिका दिव्यांग बांधवांसाठी सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी कटीबध्द आहे असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले.
ओमप्रकाश देशमुख यांनी दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या गतवर्षीतील महत्त्वपूर्ण उपक्रमांचा आढावा सादर केला. ते म्हणाले, दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण, रोजगार मार्गदर्शन आणि स्वावलंबन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी, कृत्रिम अवयव वाटप व फिजिओथेरपी शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला तसेच यू.डी.आय.डी. नोंदणी, आधार-रेशन कार्ड दुरुस्ती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विशेष केंद्रे उभारण्यात आली. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य व करिअर काउन्सेलिंग सत्रांचे आयोजनही करण्यात आले. समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यानांद्वारे जनजागृती उपक्रम राबविण्यात आले आहेत.
दिव्यांग नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम – उपायुक्त ममता शिंदे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महापालिका दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिव्यांग नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करीत आहे. समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणासाठी २०२४-२५ मध्ये तब्बल ४५ कोटींचा निधी खर्च करण्यात आला असून १० हजार ६०१ लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत देण्यात येते. दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी तीन चाकी ई-वाहनावरील फिरते दुकाने, महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग भवन, घरपोच सर्वेक्षण, लवकर निदान-उपचार अशा पथदर्शी योजना राबविण्यात येत आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्समार्फत कौशल्य प्रशिक्षण व रोजगार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून सीएसआर भागीदारीतून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. शहरातील दिव्यांग संघटनांचे सातत्यपूर्ण सहकार्य प्रशासनाला लाभत असून यामुळे या योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, असे देखील त्या म्हणाल्या.
मानव कांबळे म्हणाले की, दिव्यांग बांधवांनी मागणारे नव्हे, तर देणारे होण्याची भावना जोपासावी. त्यांनी पुढे सांगितले की, दिव्यांग बांधव नेहमीच सहकार्याची भूमिका निभावतील, फक्त प्रशासनानेही तितक्याच संवेदनशीलतेने साथ देणे गरजेचे आहे. शहरातील दिव्यांग भवन हे आमचे तीर्थक्षेत्र असून त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महानगरपालिका दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना सक्षम करण्याचे कार्य सातत्याने करत आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर निवेदिता घार्गे यांनी आभार व्यक्त केले.
विविध योजनांची माहिती देणाऱ्या केंद्रावर गर्दी
दिव्यांग बांधवांसाठी कार्यक्रम स्थळी रोजगार नोंदणी, यू.डी.आय.डी. कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड दुरुस्ती केंद्र उभारण्यात आले होते. येथे दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या विशेष केंद्रांवर विविध कागदपत्रांच्या दुरुस्तीसाठी तज्ञ कर्मचारी मार्गदर्शन करत होते. दिव्यांग बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतंत्र काउंटर, व्हीलचेअर सुविधा आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. दस्तऐवज पडताळणीसाठी आवश्यक उपकरणे आणि ऑनलाइन सेवांची सोय व्यवस्थित उपलब्ध करून देण्यात आली. दिव्यांग बांधवांना त्यांचे हक्क आणि शासन योजना याबाबत माहिती देण्यासाठी जनजागृती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम स्थळी वैद्यकीय तपासणी शिबिर, फिजिओथेरपी सल्ला तसेच मानसिक आरोग्य सल्ला यांचाही समावेश करण्यात आला. उपस्थितांना नोंदणी प्रक्रियेसाठी तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. एकूणच, दिव्यांग दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम समाजातील सर्व घटकांना सहभागी करणारा आणि दिव्यांग बांधवांना सक्षम बनवणारा ठरला.
………..
केंद्रावर झालेली नोंदणी आकडेवारी
आधार कार्ड- २५
संजय गांधी निराधार – ५०
रेशन कार्ड – १३०
यु डी आय डी कार्ड – १५०
समाज विकास – १००
दिव्यांग भवन भरती व स्वयंरोजगार नोंदणी – ९५
————-
उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्तींचा झाला सन्मान
पारस पाटील
ऋषी म्हलोत्रा
विकास जगताप
नूतन रेहमाने
जयश्री दौंडकर
रीना पाटील
अशोक भोर
पांडुरंग साळुखे
प्रियंका कटारिया
स्वपनिल अदमाने
ओम साठे
शीतल लेंभे
अमित तारे
अजित कवी
संतोष नवसुपे
सुनील वाघ
वैशाली शिंदे
राजू विटकर
रामू जाधव
धीरज नागे
प्रशांत नागे
वैशाली पवार
निशा गुप्ता
शंकर सोळसे
प्रीतम शिंदे
संकेत खरे
अदनाम अब्दुल्ला
द्विज भोसले
प्रणव जायभाये
ऋषीराज गायकवाड
शिव अहिरे
श्लोक येव्हरे
अगत्य बानकर
गौरव घुतुकडे
आरुष नागरे
प्रथमेश पारवे
यश भालेराव
नामदेव गरुड
पावन मुंढे
ज्ञानदेव खाडे
संतोष शिंदे
स्नेहल लहाने
श्रावणी शिंदे
रेहान साळवे
————-
तसेच सन्मान झालेल्या संस्था
आदित्य दीक्षित – अल्फा लावल
वैभव जोशी – बीएमसी सॉफ्टवेअर
विवेक जोशी – डब्यु टीई इंडिया
सुमेध लव्हाळे – स्पार्क मिंडा
लखन शिंदे – बिग बास्केट
दुपारच्या सत्रातील कार्यक्रम….
भावनांच्या तालासूरात बरसला कलात्मक आविष्कार
…अन रंगमंचावर थिरकला दिव्यांगांचा उत्साह…
आत्मविश्वासाने रंगमंच उजळवणारे दिव्यांग कलाकार… मंचावर थिरकणारी त्यांची निखळ कला… आणि त्यांना मिळणारी टाळ्यांची दाद… अशा उत्साहपूर्ण वातावरणात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह सुरांच्या संगतीत आणि भावनांच्या उत्स्फूर्त आविष्कारात न्हाऊन निघाले. महापालिकेने आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. या कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
दिव्यांग कलाकारांकडून सादर करण्यात येणाऱ्या नृत्य, गायन, संगीत वादन अशा प्रत्येक सादरीकरणात प्रतिभेची चमक, जिद्दीची झळाळी आणि भावनांचा आविष्कार जाणवत होता. कलाकारांच्या प्रत्येक पावलातून उमटणारी उभारी, प्रत्येक सुरातून जाणवणारी संघर्षगाथा आणि प्रत्येक सादरीकरणानंतर प्रेक्षकांकडून मिळणारी टाळ्यांची दाद, यामुळे प्रेक्षागृहात एक अद्वितीय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या मनमोहक कलाप्रस्तुतींनी ‘कला ही कोणत्याही मर्यादेपलीकडची असते’ हे सत्य रंगमंचावर पुन्हा एकदा उजळून निघाले.
दिव्यांगांच्या या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संघटनांचे स्वयंसेवक, दिव्यांग कलाकार आणि त्यांचे पालक यांच्यासह नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांना दिलेल्या प्रोत्साहनाने सभागृह भावनांच्या लहरींनी दुमदुमून गेले होते.













































