दिवाळी काळात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आर.आर.आर. केंद्राना नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘जुनी वस्तू, नवा उपयोग’ संकल्पनेला मिळाला उत्तम प्रतिसाद

0
8

*पुनर्वापरातून साजरी झाली आनंदाची दिवाळी तब्बल ३१ टन इतक्या वस्तू झाल्या जमा

पिंपरी, २ : ‘जुनी वस्तू, नवा उपयोग’ या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देत पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू केलेल्या आर.आर.आर. ( रिड्यूस रियुज, रिसायकल ) केंद्रांनी यंदाची दिवाळी सामाजिक जबाबदारीची दिवाळी म्हणून उजळवली आहे.

आठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण ३२ प्रभागनिहाय सुरू असलेल्या आर.आर.आर. केंद्रांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात दान केल्या गेल्या आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना जुने कपडे, खेळणी, भांडी, पुस्तकं, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांसारख्या वस्तू केंद्रात जमा करण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनीही हे आवाहन मनापासून स्वीकारत दानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या वस्तूंचे वर्गीकरण करून त्या गरजू कुटुंबांना वितरित केल्या जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या घरातही आनंदाचा दिवा प्रज्वलित झाला आहे.

या उपक्रमाला अधिक गती देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जनजागृती बरोबरच विविध सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन विशेष वस्तू संकलन मोहीम राबविण्यात आली होती. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

महापालिकेच्या सर्व आर.आर.आर. केंद्रांवर मिळून तब्बल ३१ टन पुनर्वापरा योग्य वस्तू जमा झाल्या आहेत. या माध्यमातून ‘पुनर्वापरातून पर्यावरण संवर्धन’ या संकल्पनेला नागरिकांच्या सहकार्याने बळ मिळाले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आर.आर आर. उपक्रमासाठी विशेष जनजागृती मोहिम राबवण्यात येत असून, “स्वच्छता, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धन” या तिन्ही मूल्यांचा संगम साधणाऱ्या या अभियानात नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

येथे आहे आर.आर.आर. सेंटर

“अ” क्षेत्रीय कार्यालय : कापसे उद्यान, मोरवाडी (प्र. १०), आकुर्डी भाजी मंडई (प्र. १४), संत तुकाराम महाराज गार्डन (प्र. १५), श्रीधरनगर गार्डन (प्र. १९)

“ब” क्षेत्रीय कार्यालय : एसकेएफ कंपनी शेजारी, थेरगाव (प्र. १७), हेगडेवार पूल, दर्शननगरी (प्र. १८), धर्मराज चौक, रावेत (प्र. १६), ज्योतिबा उद्यान, काळेवाडी (प्र. २२)

“क” क्षेत्रीय कार्यालय : हेगडेवार क्रीडा संकुल, अजमेरा (प्र. ९), धावडे वस्ती, भोसरी (प्र. ६), संत सावता महाराज उद्यान, मोशी (प्र. २), संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी नगर

“ड” क्षेत्रीय कार्यालय :लिनियर गार्डन, कोकणे चौक (प्र. २८), ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळे निलख (प्र. २६), तानाजी कलाटे उद्यान, वाकड (प्र. २५), प्रभाग कार्यालय क्र. २९

“इ” क्षेत्रीय कार्यालय : मोशी चौक (प्र. ३), दिघी जकात नाका (प्र. ४), राजमाता जिजाऊ उड्डाण पूल, भोसरी (प्र. ५, ७)

“फ” क्षेत्रीय कार्यालय : वृंदावन, चिखली (प्र. १), भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान (प्र. ११), रूपीनगर पोलिस चौकी (प्र. १२), शनि मंदिर, सेक्टर २१ (प्र. १३)

“ग” क्षेत्रीय कार्यालय : थेरगाव हॉस्पिटल शेजारी, जगताप नगर (प्र. २३), मोरू बारणे उद्यान, थेरगाव (प्र. २४), पिंपरीगाव बसस्टॉप (प्र. २१), आरोग्य कोठी, रहाटणी गावठाण (प्र. २७)

“ह” क्षेत्रीय कार्यालय : छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, संत तुकाराम नगर (प्र. २०), सितांगण गार्डन (प्र. ३०), कै. काळुराम जगताप तलाव (प्र. ३१), जुनी सांगवी भाजी मंडई (प्र. ३२).

आर.आर.आर. केंद्रांच्या माध्यमातून या उपक्रमात नागरिक घेत असलेला उत्स्फूर्त सहभाग, हेच या उपक्रमाचे खरे यश आहे. दिवाळीच्या काळात लोकांनी स्वतःचा आनंद इतरांशी वाटून सामाजिक जबाबदारीचे सुंदर उदाहरण निर्माण केले आहे. ‘जुनी वस्तू, नवा उपयोग’ या संकल्पनेतून नागरिकांनी पर्यावरण संवर्धन आणि माणुसकी या दोन्ही मूल्यांची जपणूक केली आहे.

-विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
………

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आर.आर.आर. केंद्र या उपक्रमातून दिवाळी साजरी करताना ‘पुनर्वापरातून पर्यावरण संवर्धन’ साध्य झाले असून, गरजूंच्या घरातही आनंदाचा प्रकाश पसरला आहे. आर. आर. आर केंद्र हा उपक्रम वर्षभर सुरू असून अधिकाधिक नागरिकांनी आपल्या घरातील वापरता नसलेल्या परंतु सुस्थितीत असणाऱ्या वस्तू महापालिकेच्या या केंद्रात जमा कराव्यात, जेणेकरून गरजूंना त्याची मदत होईल.

-डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका